सिंबायोसिसच्या एमबीएला प्रवेशासाठी संस्थेच्या एचआरकडे मागितले २० लाखांचे डोनेशन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सिंबायोसिस संस्थेच्या एमबीएमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली संस्थेच्याच एचआर प्रमुखाकडे २० लाखांचे डोनेशन मागण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर गेले चार महिने फरार असलेल्या एका व्यक्तीस पुणे पोलिसांनी कोलकत्ता विमानतळावर पकडले. तो पत्नीसह थायलंडला पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना ही कारवाई करण्यात आली.
कुमार कुणाल बिरेंद्रकुमार विद्यार्थी (वय ३०, मूळ रा. बिहार) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. विशेष म्हणजे कुमार विद्यार्थी याच्याविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा जानेवारी २०२१ मध्ये दाखल झाला होता. या गुन्ह्यात सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतरही तो पुण्यात मोठे कार्यालय उभारून राजरोसपणे फसवणूक करत होता. तरीही पोलिसांनी त्याच्यावर काहीही कारवाई केली नव्हती.
याबाबत सिंबायोसिसच्या मनुष्यबळ विकास विभागातील अधिकारी गणेश शिंदे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी दिव्या, आकाश यादव, आणि कुणाल कुमार विद्यार्थी यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. यातील दिव्या आणि आकाश यादव हे साथीदार अद्याप फरार आहेत.
फिर्यादींना यूट्यूब चॅनेलवर सिंबायोसिसच्या इमारतीचा फोटो, संस्थेचा लोगो दिसला. त्यामध्ये सिंबायोसिसमध्ये एमबीए अॅडमिशनसाठी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश हवा असल्यास ज्यांचे बजेट आहे, त्यांनी संपर्क साधावा, अशी खोटी जाहिरात करण्यात आली होती. त्यांनी संबंधितांशी संपर्क साधल्यानंतर त्यांना बाणेर येथील कार्यालयात बोलावण्यात आले.
त्यांना सुरुवातीला फी शिवाय ५ लाख रुपये आणि मूळ कागदपत्रे द्यावी लागतील. तुमचे नाव मेरिट यादीत आल्यानंतर उर्वरित १५ लाख द्यावे लागतील, त्याशिवाय मूळ कागदपत्रे परत मिळणार नाहीत, असे सांगून २० लाख रुपये डोनेशनची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर गणेश शिंदे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी दोन ते तीन वेळा या आरोपींचा शोध घेण्यासाठी दिल्ली, हरियाणा येथे जाऊन आले होते. परंतु, ते सतत पळून जात होते. पोलिसांनी या आरोपींची लुक आऊट नोटीस जारी करून दिल्ली, हरियाणा तसेच महाराष्ट्रभर शोध सुरू केला होता.
त्यांच्या पूर्व इतिहासाची माहिती घेतल्यावर कुमार कुणाल विद्यार्थी याच्यावर यापूर्वी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याचे आढळले. त्यात अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानेफेटाळल्यानंतरही त्याला अटक झाली नव्हती.
त्यानंतर ३१ मे रोजी कुणाल कुमार हा त्याच्या पत्नीसह थायलंडला जाण्यासाठी कोलकत्ता विमानतळावर जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेतील एक पथक तात्काळ कोलकत्ताला पाठवण्यात आले. कोलकत्ता विमानतळावर सापळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आले. कुणाल विद्यार्थी याला पुण्यात आणून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार प्रवीण उत्तेकर, दत्ताराम जाधव, संदीप शिर्के, विशाल दळवी, मारुती पारधी, आणि संदेश काकडे यांनी केली आहे.
अॅडमिशन घेताना ही काळजी घ्यावी
वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी आता प्रवेश सुरू झाले आहेत. चांगल्या महाविद्यालयात आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा, अशी सर्व पालकांची इच्छा असते. त्यातूनच मग आडमार्गाने प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे अनेक पालकांची दरवर्षी फसवणूक होत असते.
» कोणत्याही संस्थेत अॅडमिशन घेताना संस्थेतील अधिकृत अधिकाऱ्यांशीच संपर्क साधावा.
» कोणीही मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देतो, असे सांगून डोनेशनची मागणी करत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नये.
» अशा व्यक्तींना आपल्या पाल्याची मूळ कागदपत्रे देऊ नयेत.
