खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात होता ८ महिने फरार : गुन्हे शाखेच्या युनिट ३ची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी कर्वेनगरमधील बिअर बारमध्ये टोळक्याने तिघांना बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर मोक्का कारवाई झाल्यानंतर गेल्या ८ महिन्यांपासून फरार असलेल्या या टोळक्यातील एका गुंडाला गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने जेरबंद केले आहे.
रोहन राजेश धिवार (वय २२, रा. वडगाव धायरी) असे या गुंडाचे नाव आहे. रवी जाधव, यश घोलप, बारक्या लोणारे यांचा मित्र ओंकार लोहकरे याचा वर्षभरापूर्वी खून झाला होता. या कारणावरून कर्वेनगर येथील चंद्रलोक बिअर बारच्या बाहेर रवी जाधव, यश घोलप, बारक्या लोणारे आणि त्यांच्या १४ ते १५ साथीदारांनी प्रतीक भोकरे, रोहित रहाटे, नितीन जमादार यांच्यावर जीवघेणा हल्ला करून कोयता, अॅल्युमिनियम पाईप, पेव्हिंग ब्लॉकने बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली होती.
“आम्हीच तिथले भाई” असे म्हणून टोळक्याने परिसरात दहशत निर्माण केली होती. या गुन्ह्यातील अनेकांना पोलिसांनी अटक केली आहे. टोळीची कर्वेनगर भागात दहशत असल्याने पोलिसांनी त्यांच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. या टोळीतील रोहन धिवार हा त्यावेळी पासून फरार होता.
पोलीस अंमलदार अमित बोडरे व चेतन शिरोळकर यांना त्यांच्या बातमीदारांनी माहिती दिली की, रोहन धिवार स्वारगेट बसस्थानकावर आला आहे. या माहितीची खात्री करून पोलिस पथकाने स्वारगेट बसस्थानकातून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत रोहन धिवार याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, परि. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील हंस, सुरेश पाटील, पोलीस अंमलदार पंढरीनाथ शिंदे, अमित बोडरे, किशोर दुशिंग, चेतन शिरोळकर, अक्षय गायकवाड, अर्चना वाघमारे, भाग्यश्री वाघमारे, सुजीत पवार यांनी केली आहे.
