पूर्ववैमनस्यातून तरुणाचा केला होता खुन, ११ जणांवर कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पूर्ववैमनस्यातून तरुणावर हत्याराने वार करून त्याचा खून करणाऱ्या व आंबेगाव परिसरात दहशत माजविणाऱ्या आकाश थोरात टोळीवर पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.
टोळीप्रमुख आकाश भरत थोरात (वय ३२, रा. अटल चाळ, आंबेगाव खुर्द), अजित अंकुश धनवडे (वय २४), आदित्य जालिंदर शिंदे (वय १८), रोहित बाळासाहेब कचरे (वय २१), विशाल ऊर्फ गोड्या दीपक गणेचारी (वय २१) यांच्यासह ६ अल्पवयीन मुलांचा मोक्का कारवाई झालेल्यांमध्ये समावेश आहे.
याबाबत यश खंडु कांबळे (वय २३, रा. कात्रज) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कांबळे यांचे मित्र आदित्य काकडे व साहिल काकडे, सार्थक ऊर्फ ओम नितीन पंडित (रा. अटल चाळ, कात्रज) यांचा ग्रुप आहे. काकडे यांच्या पानटपरीवर आदित्य शिंदे एक वर्षापूर्वी गेला होता. त्यांच्यामध्ये झालेल्या भांडणातून आदित्य व साहिल काकडे यांनी आदित्य शिंदे याला मारहाण केली होती.
५ एप्रिल २०२५ रोजी रात्री साडेदहा वाजता यश कांबळे व सार्थक पंडित हे दुचाकीवरून जात असताना आकाश थोरात व त्यांच्या साथीदारांनी दुचाकी अडवून “तुम्हाला लय मस्ती आली का? तुमचे मित्र आदित्य काकडे, साहिल काकडे यांनी आमच्या मित्राला मारहाण केली आहे.
आमच्या भाईंनी बघून घ्यायला सांगितले आहे. आम्ही तुम्हाला जीवंत सोडत नाही,” असे म्हणत काही अल्पवयीन मुलांनी धारदार शस्त्रांनी यश कांबळे व सार्थक पंडित यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यात हे दोघे गंभीर जखमी झाले. उपचार सुरू असताना सार्थक पंडित याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी आधी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. पंडित यांच्या मृत्यूनंतर त्यात खूनाचे कलम वाढविण्यात आले. आकाश थोरात टोळीतील प्रमुख व इतर साथीदारांवर २०१५ पासून एकूण १० गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आकाश थोरात याने टोळीचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या गुन्हेगार साथीदारांचा वापर केला आहे.
त्यांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असली तरी बेकायदेशीर कारवाया वाढतच होत्या. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्यामार्फत या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्याकडे पाठविला. बनसोडे यांनी प्रस्तावाची छाननी करून मोक्का अंतर्गत कारवाईचा आदेश दिला.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त अतुल नवगिरे, राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे, पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे, सहाय्यक पोलीस फौजदार चंद्रकांत माने, पोलीस हवालदार ढमढेरे, पोलीस अंमलदार अजय सावंत, आबासाहेब खाडे यांनी केली आहे.