महावितरणचा सहाय्यक अभियंता आणि खासगी व्यक्ती लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : महावितरण कंपनीकडे घरगुती वीज कनेक्शन मंजूर करण्यासाठी तब्बल ३५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. याबाबत खासगी व्यक्ती मार्फत २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास रंगेहाथ पकडले.
सहाय्यक अभियंता रामप्रसाद सुखदेव नरवडे (वय २४) आणि खासगी व्यक्ती श्यामलाल असोकन (वय ३४, रा. सिल्व्हर, बोराटेवाडी, मोशी) अशी त्यांची नावे आहेत. रामप्रसाद नरवडे हा महावितरणच्या भोसरी येथील स्पाईन सिटी उपविभागात कार्यरत आहे.
शासकीय विद्युत ठेकेदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. हे ठेकेदार त्यांच्या कडे येणाऱ्या लोकांसाठी महावितरण कंपनीचे लायझनिंग आणि वीज कनेक्शन मंजुरीचे काम करतात. तक्रारदार यांनी ४ मार्च २०२५ रोजी महावितरणच्या भोसरी कार्यालयात एका ग्राहकाच्या वीज कनेक्शनसंदर्भात अर्ज दाखल केला होता.
हा अर्ज कार्यवाहीसाठी रामप्रसाद नरवडे याच्याकडे आला होता. हे घरगुती कनेक्शन मंजूर करून देण्यासाठी त्याने तक्रारदाराकडे ३५ हजार रुपयांची लाच मागितली होती. या तक्रारीची ६ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंद झाली.
त्यानंतर मंगळवारी पंचासमक्ष पडताळणी केली असता, नरवडे याने तडजोडीअंती २५ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली असल्याचे निष्पन्न झाले. बुधवारी सापळा रचण्यात आला. फियार्दी लाचेची रक्कम घेऊन नरवडे याच्या कार्यालयात गेले.
त्याने कार्यालयात हजर असलेल्या श्यामलाल याच्याकडे २५ हजार रुपये देण्यास सांगितले. तक्रारदारांनी पैसे देताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. हा तपास पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे करत आहेत.
