हप्ता न दिल्यामुळे ९० हजारांचे साहित्य लुटले : शिवम आंदेकरसह दोघांना अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शहराच्या पूर्व भागात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय असलेल्या आंदेकर टोळीने गणेश पेठेतील मच्छी मार्केटमधील एका दुकानदाराकडून तब्बल ८ वर्षे दरमहा ५० हजार रुपयांचा हप्ता वसूल केला. एकूण ४८ लाख रुपयांची खंडणी उकळल्यानंतर, मे महिन्यात हप्ता थकवला म्हणून टोळीने दुकानावर धाड टाकत ९० हजार रुपयांचे साहित्य लुटले.
या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी टोळीप्रमुख शिवम उदयकांत आंदेकर (३०, रा. अशोक चौक, नाना पेठ) आणि आकाश परदेशी (३०, रा. लोहियानगर) यांना अटक केली आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात एका ४० वर्षीय व्यापाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, २०१६ मध्ये शिवम आंदेकरने जीवे मारण्याची धमकी देत दरमहा ५० हजार रुपयांचा हप्ता मागितला होता.
त्यानंतर आकाश परदेशी दर महिन्याला ही रक्कम घेऊन जायचा. ही रक्कम ऑनलाईन पद्धतीने टोळीपर्यंत पोहोचवण्यात येत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात हप्ता न दिल्यामुळे आंदेकर टोळीने दुकानातील साहित्य टेम्पोमध्ये भरून जबरदस्तीने पळवले.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजित जाधव, सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर रात्री उशिरा आंदेकर आणि परदेशी यांना अटक करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक अजित जाधव करत आहेत.
एकाच दुकानदाराकडून ४८ लाख हप्ता – संपूर्ण भागात किती?
फक्त एका दुकानदाराकडून इतकी मोठी रक्कम वसूल झाली असल्याचे उघड झाल्यानंतर, आंदेकर टोळी संपूर्ण परिसरातून दरमहा किती हप्ता वसूल करत असेल, याबाबत शहरात चर्चेला उधाण आले आहे. टोळीच्या इतर बड्या गुन्ह्यांचीही चौकशी सुरू असून, आणखी काही धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता आहे.
