हाय राइज कमिटीचे सादरीकरण बंधनकारक नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मुंबई व ठाण्याप्रमाणेच पुणे शहरातही आता गगनचुंबी इमारतींच्या बांधकामाला गती मिळणार आहे. ७० मीटरपेक्षा उंच इमारतींसाठी ‘हाय राइज कमिटी’समोर सादरीकरण करण्याची अट आता रद्द करण्यात येणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
क्रेडाई पुणे मेट्रोच्या नवनिर्वाचित समितीच्या पदस्थापना समारंभात शिंदे बोलत होते. त्यांनी स्पष्ट केले की, यामुळे उंच इमारतींच्या परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होईल व पुण्यातील विकासाला गती मिळेल.
पुण्याच्या विकासाला आता ‘आडव्या’ ऐवजी ‘उभ्या’ दिशेने वेग येणार आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे उंच इमारतींच्या संकल्पनांना चालना मिळणार असून, पुणे शहराची आंतरराष्ट्रीय शहरांप्रमाणे प्रगती होण्याची शक्यता वाढली आहे.
» पुण्याची भौगोलिक रचना आणि मर्यादा
» शहर आडवंच नव्हे, तर उभं वाढणार
» शहराचा आकार बशीसारखा असून तीन बाजूंना लष्कराच्या जागा, टेकड्या व वन विभागाच्या जमिनी आहेत. परिणामी, विस्तारासाठी उपलब्ध जागा मर्यादित आहे. त्यामुळे पुण्याचा विकास उंच इमारतींच्या माध्यमातूनच होणार
» युडीसीपीआर, टीडीआर व हरित इमारतींसाठी सकारात्मक बदल
» पीएमआरडीए आराखड्याला गती; टीडीआरसाठी ऑनलाईन पोर्टल
» शिंदे यांनी सांगितले की, पीएमआरडीएचा विकास आराखडा लवकरच मार्गी लावला जाईल आणि युडीसीपीआर (Unified Development Control and Promotion Regulations) लवकरच लागू केला जाईल. त्याचबरोबर टीडीआर (TDR) साठी स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. हरित इमारतींना प्रोत्साहन देण्यासाठीही नियमांमध्ये आवश्यक ते बदल केले जातील.
» पुण्यातील प्रमुख गगनचुंबी इमारती
» अमनोरा गेटवे टॉवर्स सर्वाधिक उंचीवर
» सध्या पुण्यात ८० मीटरपेक्षा उंच १७ इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यातील काही प्रमुख इमारती :
अमनोरा गेटवे टॉवर्स हडपसर १६५ मीटर ४५ मजले
अॅड्रेनी टॉवर्स हडपसर ११९ मीटर ३५ मजले
ब्लू रिज हिंजवडी ११८ मीटर ३२ मजले
न्याती आयरिस खराडी ११७ मीटर ३२ मजले
केस्टेल रॉयल खडकी १११ मीटर ३० मजले
पंचशील टॉवर्स खराडी १०० मीटर ३२ मजले
याशिवाय कोरेगाव पार्क, बोट क्लब रोड, शिवाजीनगर, बोपोडी आदी भागांमध्ये ४० मजल्यांपेक्षा उंच इमारतींचं बांधकाम सुरु आहे.
मुंबईतील उंच इमारती
मुंबईतील पॅलेस रॉयल (वरळी) ही देशातील सर्वाधिक उंच, ३२० मीटरची इमारत आहे. त्यात ८८ मजले व अवघ्या १५३ आलिशान अपार्टमेंट्स आहेत. यानंतर लोखंडवाला मिनर्व्हा (३०१ मीटर) व पिरामल अरण्य आरव (२८२ मीटर) या इमारती आघाडीवर आहेत.
