जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती : खनिज उत्खननासाठी ऑनलाइन परवानगी प्रणाली कार्यान्वित
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांसाठी दिलासादायक बातमी! आता बांधकाम परवानगीसोबतच बिगरशेती (एनए) परवानगी मिळणार असून, खनिज उत्खननासाठी ऑनलाइन परवानगीची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील बांधकाम प्रकल्पांसाठी लागणाऱ्या विविध परवानग्यांची प्रक्रिया आता अधिक सुलभ होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आता खनिज उत्खननासाठी ऑनलाइन पद्धतीने परवानगी दिली जाणार आहे.
विशेष म्हणजे, येत्या आठवड्याभरात बिगरशेती (एनए) परवानगी देखील बांधकाम परवानगीबरोबरच एकत्रित स्वरूपात मिळणार आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात वारंवार हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. तसेच, एनए कर कमी करण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
क्रेडाईच्या पदग्रहण सोहळ्यात जिल्हाधिकारी डुडी बोलत होते. यावेळी पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, क्रेडाईचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनीष जैन, तसेच माजी अध्यक्ष रणजित नाईकनवरे उपस्थित होते.
डुडी यांनी सांगितले की, महापालिकेकडून बांधकाम व्यावसायिकांना विविध परवाने दिल्यानंतर ते प्रत्यक्ष प्रकल्प सुरू करतात. त्यावेळी जागेवर उत्खनन केले जाते. या उत्खननासाठी लागणाऱ्या गौण खनिज वाहतुकीची परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळते. मात्र, ही प्रक्रिया वेळखाऊ ठरत असल्याने व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होते.
हा वेळ व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ही परवानगी प्रक्रिया ‘महाखनिज पोर्टल’ शी जोडण्यात आली आहे. आता ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होणार असल्यामुळे ती अधिक पारदर्शक, वेगवान आणि कार्यक्षम होईल. बांधकाम व्यावसायिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
