फिरायला आलेल्या तरुणांवर गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन उकळले २८ हजार, पोलीस निलंबित
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्थापन करण्यात आलेल्या पोलिस मदत केंद्रातील एक पोलीसच खंडणीखोर निघाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
फिरायला आलेल्या तिघा तरुणांना गुन्हा दाखल करण्याची धमकी देत, पोलिस अंमलदाराने आपल्या मित्रासह २८ हजार रुपयांची खंडणी उकळली. या प्रकरणी संबंधित पोलीस अंमलदारास निलंबित करण्यात आले असून, दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ५ जून रोजी सकाळी ७ ते साडेनऊच्या दरम्यान घडली. चेन्नई येथील एका १९ वर्षीय तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. फिर्यादी आपल्या पुण्यातील दोन नातेवाईकांसोबत बोपदेव घाटात फिरण्यासाठी आले होते.
पोलिस अंमलदार विक्रम वडतीले ड्युटीवर असताना त्यांनी तरुणांच्या बॅगांची झडती घेतली आणि त्यामध्ये हुक्का पॉट सापडल्याचा दावा करत त्यांना गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने स्वतःच्या टाटा नेक्सॉन कारमध्ये बसवून पोलिस ठाण्याच्या मुख्य दरवाज्यापर्यंत आणले आणि पुढे ससून रुग्णालयात घेऊन गेले.
तेथे त्यांचं भविष्य उध्वस्त करण्याची धमकी देत प्रत्येकी २५ हजार रुपयांची मागणी केली. आर्थिक अडचणीमुळे तडजोड करून १० हजार रुपये प्रति व्यक्ती, असे एकूण २८ हजार रुपये मित्र केदार जाधव याच्या गुगल पे अकाउंटवर ऑनलाईन घेतले गेले.
नंतर काय घडलं? तक्रारदार कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असताना, त्यावेळी संबंधितांनी पैसे परत केले. परंतु घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी अंमलदार वडतीले यास तात्काळ निलंबित केले.
या प्रकरणात पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप तपास करत असून, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे व वरिष्ठ निरीक्षक विनय पाटणकर यांनी घटनास्थळी भेट दिली.
