तरुणावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न : गोविंद पाटीलनगर येथील घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : धनकवडी भागात टोळक्याने दहशत माजवत एका तरुणावर कोयत्याने वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बाबा मालुसरे (वय १९), संकेत कसबे (वय १८), सोहम सोनार (वय २०, सर्व रा. धनकवडी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत नितेश विनोद गायकवाड (वय १८, रा. गोविंद पाटीलनगर, धनकवडी) याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितेश गायकवाड मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घरासमोर थांबलेला असताना, आरोपी मालुसरे, कसबे आणि सोनार हे दुचाकीवरून आले. जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांनी मोठमोठ्याने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
सोहम सोनार याने त्याच्याकडील कोयता काढून नितेशवर वार केला. नितेशने हातावर वार झेलण्याचा प्रयत्न केला. आरोपींच्या हल्ल्यात तो जखमी झाला. नितेश गायकवाड यांच्या घरासमोर त्यांनी मोठमोठ्याने शिवीगाळ करत कोयते हवेत फिरवत, “आम्ही धनकवडीचे भाई आहोत, आमच्या नादाला लागायचं नाही,” असे म्हणत दहशत माजवली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार धोत्रे करत आहेत.
