पतीच्या अनैतिक संबंधावरून होत होता छळ : सिंहगड पोलिसांनी दाखल केला गुन्हा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : नातेवाईक असलेल्या तरुणीशी असलेल्या अनैतिक संबंधावरून पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिंहगड रोड पोलिसांनी सॉफ्टवेअर अभियंता पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विशाल प्रमोद शिंपी (रा. भूमी एलिगन्स सोसायटी, नर्हे) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. हर्षदा विशाल शिंपी असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. हर्षदा हिचा भाऊ प्रमोद किशोर बोरसे (वय ३५, रा. भद्रकाली, नाशिक) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही घटना नर्हे येथील भूमी एलिगन्स सोसायटीत ११ जून रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षदा आणि विशाल शिंपी यांचा विवाह २०११ मध्ये नाशिक येथे झाला होता. त्यांना जय व वल्लभ अशी दोन मुले आहेत. गेल्या ८ वर्षांपासून ते भूमी एलिगन्स सोसायटीत राहत होते.
विशाल हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून त्याने बेंगळुरू, मुंबई, केरळ येथे नोकरी केली आहे. २०१५ मध्ये तो दुबईत नोकरीस होता. २०२० मध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर तो पुण्यात परतला आणि वर्क फ्रॉम होम करत होता. त्यानंतर मागील चार वर्षांपासून तो नोकरी नसल्याने घरीच होता.
लग्न झाल्यापासून दर ६ ते ७ महिन्यांनी विशाल शिंपी हर्षदाला शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याचे ती सांगत असे. तिला दोन लहान मुले असल्यामुळे तिचे आईवडील वेळोवेळी समजूत काढत असत. मागील चार वर्षांपासून नोकरी नसल्यामुळे विशाल घरीच होता.
त्याचे नात्यातील एका तरुणीबरोबर अनैतिक संबंध होते आणि त्यावरून त्यांच्यात नेहमी वाद होत असे. तो हर्षदाला मारहाण करून अश्लील शिवीगाळ करीत असे. पतीच्या त्रासाला कंटाळून हर्षदा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात दोन मुलांसह माहेरी नाशिकला आली होती.
तिने त्या तरुणीच्या आईवडिलांना फोन करून सांगितले होते की, “तुमच्या मुलीमुळे माझा संसार नीट चालत नाही. तुम्ही तिला समज द्या.” त्यानंतर ती संपूर्ण एप्रिल महिना माहेरी होती. विशाल वेळोवेळी फोन करून तिला पुण्याला परत येण्यासाठी त्रास देत होता.
मुलाचा दहावीचा निकाल असल्यामुळे तिच्या आईवडिलांनी तिला समजावून सांगितले की, “मुलांचे आयुष्य खराब करू नकोस. नवऱ्याकडे परत जा. काही अडचण आली तर आम्हाला सांग.” आईवडील आणि बहिणीने सांगितल्यानंतर ती दोन्ही मुलांसह पुण्याला आली. मात्र, विशाल शिंपीच्या वागण्यात काहीच बदल झाला नाही.
त्यामुळे अखेर पतीच्या सततच्या छळाला कंटाळून हर्षदाने ११ जून रोजी रात्री दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. सिंहगड रोड पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल विशाल शिंपी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
