१ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत, दोघा आरोपींना अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : बार्शी शहरातील हिरेमठ हॉस्पिटलमध्ये १३ जून रोजी पहाटे चोरी झालेल्या मोबाईल प्रकरणात बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवघ्या काही तासांत तांत्रिक पद्धतीने तपास करत दोघा चोरट्यांना अटक केली असून १,४८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
फिर्यादी महेश अरविंद यादव, रा. सुभाषनगर, बार्शी हे आपल्या पत्नीच्या उपचारासाठी हिरेमठ हॉस्पिटलमध्ये रूम नं. ०५ मध्ये थांबले होते. झोपेत असताना टेबलवर ठेवलेले तीन मोबाईल फोन अज्ञात चोरट्याने चोरून नेले. यावरून बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. ५०५/२०२५, भारतीय दंड संहितेच्या कलम ३०५(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो.उ.नि. उमाकांत कुंजीर आणि त्यांच्या डीबी पथकाने सुरू केला. तपासादरम्यान हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात संशयित आरोपी सुदर्शन राजू डोंगर (वय २४, रा. लोकमान्य नगर, लातूर रोड, बार्शी) हा पूर्वीचा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे आढळले.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यासोबत त्याचा साथीदार विनायक सतीश देवकर (वय २३, रा. टिळक चौक, बार्शी) याचाही सहभाग असल्याचे उघड झाले. पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेले तीन मोबाईल, एकूण किंमत १,४८,०००/- रुपये, जप्त केले.
ही उल्लेखनीय कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहराचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, सपोफौ अजित वरपे, पोहेकॉ अमोल माने, बाबासाहेब घाडगे, पोना संगप्पा मुळे, सचिन देशमुख, अविनाश पवार, सचिन नितनात, राहुल उदार, प्रल्हाद अकुलवार आणि चालक पो.कॉ. रामेश्वर मस्के यांनी मोलाचे योगदान दिले. गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ अमोल माने करीत आहेत.
