दुबईला औषध निर्यातीच्या नावाखाली फसवणूक : दोन मेडिकल दुकानदारांविरोधात गुन्हा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दुबईतील कंपनीला औषधांची मोठ्या प्रमाणावर गरज असल्याचे सांगून, पुण्यातील वैद्यकीय औषधांचे घाऊक वितरक निलेश सोनिगरा यांना तब्बल ४ कोटी ४० लाख रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात पुण्यातील दोन मेडिकल दुकानदारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी निलेश सोहनलाल सोनिगरा (वय ४६, रा. मुकुंदनगर) यांनी यासंदर्भात विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सोनाली गिरीगोसावी (वय ४२, रा. कोहिनूर ग्लोरी सोसायटी, मोहम्मदवाडी) आणि जयेश वसंत जैन (वय ४१, रा. भक्तीपूजा अपार्टमेंट, महर्षीनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १३ मार्च ते ८ मे २०२५ या कालावधीत घडला.
निलेश सोनिगरा यांचा ‘न्यू अमर फार्मास्युटिकल्स’ नावाने औषध वितरणाचा घाऊक व्यवसाय आहे. ते शहरातील विविध हॉस्पिटल्स आणि मेडिकल्सना औषधे पुरवतात. २०२० मध्ये त्यांची ओळख सोनाली गिरीगोसावी हिच्याशी झाली, जिने ‘ओम साईनाथ मेडिकल’ नावाने दुकान चालवत असल्याचे सांगितले. गेली चार वर्षे दोघांमध्ये विश्वासावर आधारित व्यावसायिक संबंध होते.
नोव्हेंबर २०२४ मध्ये सोनालीने निलेश यांची ओळख जयेश जैन यांच्याशी करून दिली. जयेश यांचा ‘सृष्टी हेल्थकेअर’ नावाने गुरुवार पेठेत व्यवसाय आहे. जयेशने दुबईतील एका कंपनीशी आपली ओळख असल्याचे सांगून, मोठ्या प्रमाणावर औषधांची मागणी असल्याचा दावा केला. सोनालीनेही जयेशवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला.
या विश्वासावर आधारित, निलेश सोनिगरा यांनी १३ मार्च ते ८ मे २०२५ दरम्यान एक महिन्याच्या क्रेडिटवर ४ कोटी ४० लाख ३५ हजार ९०५ रुपयांची औषधे सोनालीच्या ओम साईनाथ मेडिकल्सला दिली. या व्यवहारासाठी सोनालीने ६० धनादेश दिले, मात्र वेळोवेळी पैसे देण्याचे टाळण्यात आले.
बँकेत चेक भरण्याचे सांगून नंतर खात्यात पैसे नसल्याचे सांगण्यात आले आणि शेवटी दोघांनी फोन उचलणे बंद केले. निलेश यांनी चौकशी केली असता, मॉडर्न डिस्ट्रीब्यूटर्सचे प्रदीप कावेडिया यांच्याकडूनही सोनालीने ८३.३८ लाख रुपयांची फसवणूक केल्याची माहिती मिळाली. तसेच, सोनालीने जयेशच्या संगनमताने निलेशकडून घेतलेली औषधे जयेशकडे सुपूर्द केली होती.
या प्रकारामुळे अनेक वितरक ठगवले गेले असून, या दोघांनी इतर वितरकांकडूनही मोठ्या प्रमाणात औषधे घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्याचे पैसे अद्याप दिलेले नाहीत.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अरुण घोडके करत आहेत.
