आवृत्ती पुणे
← Back to Homepage

चव्हाणनगर कमान येथे युवकांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

Spread the love

पुणे : कामावरून घरी पायी जात असलेल्या दोघा युवकांच्या डोक्यात तिघा हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांनी कोयत्याने वार इतका जोरात केला की, कोयता एका युवकाच्या डोक्यात अडकला. त्याला तत्काळ भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे.

वैभव सचिन नाईकनवरे (वय १९, रा. लक्ष्मी माता मंदिराजवळ, शंकर महाराज वसाहत, धनकवडी) असे या जखमी युवकाचे नाव आहे. त्याचा मित्र कार्तिक धनाजी गायकवाड (वय १६, रा. संभाजीनगर, धनकवडी) हाही या घटनेत जखमी झाला आहे. ही घटना पुणे-सातारा रोडवरील धनकवडी येथील चव्हाणनगर कमान भागातील एशियन पेंट्स शॉपसमोर सोमवारी रात्री ११ वाजता घडली.

याबाबत वैभव यांची आई शितल सचिन नाईकनवरे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव नाईकनवरे व कार्तिक गायकवाड हे अप्पा बळवंत चौकातील सरस्वती बुक डेपो येथे कामाला आहेत.

त्यांचे काम सकाळी १० ते रात्री १० पर्यंत असते. २६ एप्रिल २०२५ रोजी वैभव व त्याचे मित्र अथर्व ढेबे, नकुल शिंदे, सक्षम कांबळे यांची किरण पांगारे, मयूर विष्णु जावीर यांच्याशी भांडण झाली होती. त्यावेळी मयूर जावीर याने वैभव व त्याच्या मित्रांविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.

वैभव आणि कार्तिक हे दोघे कामावरून सुटल्यावर बसने घरी येत होते. पद्मावती बस स्टॉपवर उतरून ते दोघे पायी घरी जात असताना, साधारणतः रात्री ११ वाजता, चव्हाणनगर कमान येथील एशियन पेंट्स शॉपसमोर तिघे अनोळखी व्यक्ती त्यांच्यासमोर आले. त्यांनी वैभव नाईकनवरे व त्याचा मित्र कार्तिक गायकवाड यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले.

सहकारनगर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक सुरेखा चव्हाण अधिक तपास करत आहेत.