आवृत्ती पुणे
← Back to Homepage

विरोधकाचा गेम करण्यासाठी आलेल्यांचा झाला गेम

Spread the love

पुणे : खुनाच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार आपल्या विरोधकाचा खात्मा करण्यासाठी जुन्या कात्रज घाटात दोन साथीदारांसह पोहोचला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत तिघांना अटक केली आणि मोठा गुन्हा टळला.

अनिकेत संजय मालपोटे (वय २२, रा. दत्तनगर, सुतारदरा, कोथरुड) आणि निखिल मुकेश तुसाम (वय १९, रा. येराई रोड, केळेवाडी, कोथरुड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

या तिघांकडून २ लाख ९९ हजार रुपये किमतीचे ३ गावठी बनावटीचे पिस्तुल, २ एक्स्ट्रा मॅगझिन, ९ जिवंत काडतुसे, ३ मोबाईल आणि एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अनिकेत मालपोटे हा २०२३ मध्ये घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध अलंकार पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे.

कोथरुड परिसरातील एका अन्य गुन्हेगाराशी त्याची वैरभावना आहे. त्या विरोधकाचा खात्मा करण्यासाठी तो आपल्या साथीदारांसह जुन्या कात्रज घाटात एकाच दुचाकीवरून आला होता. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गुन्हे शाखेच्या युनिट २ चे बीट मार्शल पोलीस अंमलदार कृष्णा आसाराम म्हस्के आणि सौरभ राजेंद्र साळवे हे पेट्रोलिंग करत असताना, श्री लक्ष्मी गॅरेजजवळ रस्त्यालगत थांबलेल्या तिघांवर संशय आल्याने त्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस दिसताच तिघे कावरेबावरे होऊन पळू लागले.


त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने बीट मार्शलांनी त्यांना तात्काळ अडवून झडती घेतली असता, त्यांच्या कमरेला लपवलेली तीन गावठी पिस्तुलं आणि नऊ जिवंत काडतुसे सापडली. तत्काळ भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनी तिघांना ताब्यात घेतले.

या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने तिघांना १८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी करत आहेत.