आवृत्ती पुणे
← Back to Homepage

धुळे शहराच्या समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयात आढावा बैठक

Spread the love

मुंबई : धुळे महानगरपालिकेच्या विविध समस्या आणि विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी धुळेचे आमदार अनुप अग्रवाल, तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

धुळे शहरात पावसाचे आगमन झाले असून, देवपूर, वलवाडी तसेच सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने सांडपाणी गटार व्यवस्था तातडीने करण्यात यावी, असे आदेश राज्यमंत्री मिसाळ यांनी दिले. सखल भागात साचणाऱ्या पाण्याचा वेगाने निचरा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.

तसेच, धुळे महापालिकेच्या तापी पाणी पुरवठा योजने अंतर्गत सुकवद ते बाभळे, बाभळे–धुळे–मालेगाव रस्ता आणि दगडी टाकी येथील जलवाहिनींच्या दुरुस्तीच्या कामांना गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. हे काम तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात यावे, असे स्पष्ट करत विकासकामांची अंमलबजावणी अधिक गतिमान करण्यावर भर दिला.

महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांना वेळेत पूर्ण करून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचे उद्दिष्ट असल्याचेही राज्यमंत्री मिसाळ यांनी यावेळी नमूद केले.