आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

Spread the love

पुणे : जांभुळवाडी येथील तलावावर एका तरुणाचा निर्घृण खून करून पसार झालेल्या आरोपीला मध्यप्रदेशातील इंदौर येथून अटक करण्यात आली आहे.

सुरज गणेश सूर्यवंशी (वय २२, रा. गणेश पेठ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत दीपक बंडगर (वय २१, रा. नर्‍हे) यांनी फिर्याद दिली आहे. रोहित नामदेव ढमाळ (वय २१, रा. योगमुद्रा बिल्डिंग, भुमकर वस्ती, नर्‍हे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक बंडगर हा जिममध्ये असताना सुरज सूर्यवंशी याचा फोन आला. त्यानंतर दोघे दुचाकीवरून नऱ्हे कमानीजवळ आले. तेथे रोहित ढमाळही आला. तिघे मिळून जांभुळवाडी तलावावर गेले.

रोहित व सुरज सिगारेट पीत होते. धुरामुळे त्रास होऊ लागल्याने दीपक गाडीजवळ थांबला, तर दोघे आत गेले. काही वेळाने आरडाओरडा ऐकू आल्याने दीपकने आत जाऊन पाहिले असता सुरज, रोहितच्या डोक्यात दगड मारत होता.

दीपकने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तरीही तो रोहितला मारतच राहिला. या प्रकारामुळे घाबरून दीपक घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी दीपकची अस्वस्थता लक्षात आल्यावर त्याच्या आईने विचारणा केली.

त्याने आईला रात्री घडलेली हकिकत सांगितली. त्यानंतर दुपारी एक वाजता दीपकने आंबेगाव पोलीस ठाण्यात हजर होऊन माहिती दिली की १४ जून रोजी रात्री साडेदहा वाजता जांभुळवाडी तलावाच्या बंधाऱ्यावर रोहित ढमाळ याचा खून झाला आहे.

या माहितीची खातरजमा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक गजानन चोरमले, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर आणि अंमलदारांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

एका तरुणाचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. मृत तरुणाची ओळख रोहित ढमाळ अशी झाली. अधिक तपासात सुरज सूर्यवंशी इंदौर येथे पळून गेल्याचे समजले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, अंमलदार चेतन गोरे, हणमंत मासाळ, धनाजी धोत्रे आणि सचिन गाडे यांच्या पथकाने इंदौर येथे जाऊन तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका गोरे, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, मारुती वाघमारे, शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, विनायक पाडळे, निलेश जमदाडे, सचिन तनपुरे, प्रमोद कांबळे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, सुभाष मोरे, हरिश गायकवाड आणि अजय कामठे यांनी केली आहे.