आवृत्ती पुणे
← Back to Homepage

तुमचा पासवर्ड हॅक तर झाला नाही ना?

Spread the love

पुणे : जगभरातील ३० डेटाबेसमधील १६ अब्ज खात्यांचे पासवर्ड हॅकर्सनी चोरले आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम, जीमेल, अ‍ॅप आदी सेवांचा समावेश त्यामध्ये आहे. सायबर न्यूजच्या संशोधकांनी ही चोरी उघडकीस आणली आहे. त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या कंपन्यांनी तसेच व्यावसायिकांनी खबरदारी म्हणून ज्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून आर्थिक व्यवहार करतात, त्यांचे पासवर्ड तातडीने बदलण्याची आवश्यकता आहे.

हॅकर्सनी कोट्यवधी युजर्सचा खासगी डेटा चोरला असून, ही इतिहासातील सर्वात मोठी पासवर्ड चोरी असण्याची शक्यता आहे. चोरलेला हा डेटा अतिशय नवा असून, तो इन्फोस्टिलर मालवेअरच्या माध्यमातून गोळा करण्यात आला आहे. हे मालवेअर लोकांचा डेटा त्यांना न कळता चोरते. हॅकर्सनी ही चोरी केली असून, ते हा डेटा थेट वापर करू शकतात किंवा डार्क वेबवर विक्रीस काढतात.

डार्क वेबवर क्षुल्लक पैशांमध्ये सायबर चोरटे हा डेटा विकत घेऊन सायबर गुन्हे करू शकतात. कोट्यवधींचा हा खासगी डेटा लीक होण्याची भीती आहे. त्यामुळे लोकांना फिशिंग स्कॅम, डेटा चोरी आणि खाते हॅक होण्याच्या संकटाचा सामना करावा लागू शकतो.

काय काळजी घ्याल?
» इंटरनेट वापरणाऱ्यांनी तातडीने पासवर्ड बदलण्याच्या सूचना सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी दिल्या आहेत.
» विशेषतः ज्या खात्यांचा वापर आर्थिक व्यवहारांसाठी केला जातो – जसे की जीमेल, बँक व्यवहार करणारे मोबाईल अ‍ॅप्स – त्यांचे पासवर्ड अधिक मजबूत करणे गरजेचे आहे.
» अनेकांचे पासवर्ड खूप सोपे असतात. त्यामुळे ते लक्षात ठेवणे व शोधणे सोपे जाते. त्यामुळे पारंपरिक पद्धतीतील पासवर्डमध्ये बदल करून पास की सारख्या सुरक्षित पर्यायांचा वापर करण्याची सूचना ‘गुगल’ने केली आहे.
» अनोळखी व्यक्तीकडून आलेले एसएमएस किंवा ई-मेल, विशेषतः लॉग-इनची माहिती विचारणाऱ्या लिंकवर क्लिक करू नये, असा सल्ला ‘एफबीआय’ने दिला आहे.