डेक्कन पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अंमलदारांना निलंबित
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : अडचणीच्या वेळी तातडीने घटनास्थळी पोहोचून नागरिकांना मदत करता यावी, यासाठी शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याला गस्तीसाठी मोबाईल व्हॅन देण्यात आली आहे. तसेच गस्त घालण्यासाठी बीट मार्शल नेमण्यात आले आहेत. मात्र, सुरक्षेसाठी नेमलेले हेच पोलीस रात्री अपरात्री नागरिकांना अडवून लुबाडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
डेक्कनमधील लॉ कॉलेज रोडवरील गल्लीतील ही घटना समजल्यानंतर पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दोघा पोलीस अंमलदारांना निलंबित केले आहे. गणेश तात्यासो देसाई आणि योगेश नारायण सुतार अशी या पोलीस अंमलदारांची नावे आहेत.
पोलीस अंमलदार गणेश देसाई याची १७ जून रोजी रात्रपाळीसाठी मोबाईल व्हॅनवर वाहनचालक म्हणून, तर योगेश सुतार याची बालगंधर्व परिसरात बीट मार्शल म्हणून नेमणूक करण्यात आली होती. डेक्कन पोलीस ठाण्यात एका तक्रारी अर्ज आला होता. त्यात, तक्रारदार व त्यांची मैत्रीण हे लॉ कॉलेज रोडवरील दामले पथ येथील गल्लीत कार पार्क करून थांबले होते.
त्यावेळी दोन पोलीस अंमलदार आले आणि “या भागातून तक्रार आली आहे, पैसे द्या,” असे सांगून २० हजार रुपये मागितले. एवढे पैसे का, असे विचारले असता त्यांनी “चौकीला चला” असे सांगितले. पोलिसांची व चौकीची भीती वाटून तक्रारदाराने चौकीला न जाण्याचा निर्णय घेत पैसे देण्याचे मान्य केले.
त्यानंतर गणेश देसाईच्या दुचाकीवर मागे बसून ते कमला नेहरू पार्कजवळील एटीएममध्ये गेले आणि तिथून २० हजार रुपये काढून दिले. कायद्याचे उल्लंघन केल्यास संबंधित नागरिकांना पोलीस ठाण्यात घेऊन जाणे गरजेचे असते. मात्र, त्यांनी कोणतीही अधिकृत कारवाई न करता फक्त पैसे घेत सोडून दिले.
त्यामुळे कर्तव्यात झालेली बेजबाबदारपणा आणि पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याबद्दल पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दोघांनाही निलंबित केले आहे. यापूर्वी बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडल्यानंतर तेथे नव्याने पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात आले होते.
त्या केंद्रातील एका पोलिसाने हुक्का पित बसल्याचा आरोप करत कारवाईच्या नावाखाली तरुणांना लुबाडले होते. तसेच बाणेर येथील एका सोसायटीत रात्री उशिरापर्यंत काम सुरू असल्याची तक्रार आल्यानंतर, सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना तिथल्या बीट मार्शलांनी पैसे घेऊन लुबाडले होते.
