महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भुम : मराठी साहित्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे संत साहित्याचे अभ्यासक आणि वीज क्षेत्रातील दिग्गज प्रशासक डॉ. मुरहरी केळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून मराठी विषयातील पीएच.डी. पदवी बहाल करण्यात आली आहे.
“निवडक मराठी साहित्यातील विजेचे चित्रण : एक अभ्यास” या आगळ्या-वेगळ्या विषयावर त्यांनी सादर केलेला शोधप्रबंध विद्यापीठाने मान्य केला आहे. डॉ. केळे यांनी गेल्या हजार वर्षांतील मराठीतील काव्यात्म, कथनात्म, नाट्यात्म साहित्याचे अभ्यासपूर्वक विश्लेषण करत ‘वीज’ या संकल्पनेचे सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, भावनिक आणि वैज्ञानिक पैलूंनी सखोल संशोधन केले.
वैदिक साहित्यापासून ते संत-पंत-तंत साहित्य, तसेच अर्वाचीन व आधुनिक साहित्यापर्यंत त्यांनी साद्यंत अभ्यास करत महत्त्वपूर्ण निष्कर्ष मांडले आहेत. डॉ. केळे हे त्रिपुरा राज्य विद्युत मंडळाचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राहिले असून, महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील वीज कंपन्यांतही त्यांनी संचालकपदाची जबाबदारी पार पाडली आहे.
शिक्षणाविषयी विशेष आस्था असलेल्या डॉ. केळे यांनी अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कायदा, माहिती-तंत्रज्ञान, पत्रकारिता, उर्जा अंकेक्षण अशा विविध क्षेत्रांतील दहा पदव्या मिळवल्यानंतरही शिक्षणाची ओढ कायम ठेवत ‘पॉवर डिस्ट्रीब्युशन फ्रँचायझी’ या विषयावर नागपूर विद्यापीठातून पहिली पीएच.डी. प्राप्त केली होती. मराठी भाषेवरील प्रेमातून त्यांनी एम.ए. करून दुसरी पीएच.डी. मिळवली आहे.
त्यांच्या या दुहेरी यशाबद्दल तेलंगणाचे राज्यपाल आणि त्रिपुरा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री श्री. जिष्णू देव वर्मा, विद्यापीठाचे कुलगुरू व उपकुलगुरू, तसेच अनेक साहित्यिक, प्राध्यापक, अभ्यासक, समाजबांधव आणि वीज क्षेत्रातील सहकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. मराठी साहित्यातील त्यांच्या या अमूल्य व आगळ्यावेगळ्या योगदानाची साहित्यविश्वात विशेष दखल घेतली जात आहे.
