दागिने बनवून घेऊन परत केले नाही सोने; दोघा सराफांसह तिघांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दागिने बनविण्यासाठी सराफांनी दिलेले सोने घेऊन कारागीर पसार झाल्याच्या बातम्या नेहमी वाचनात येतात. पोलीस मग या कारागीरांना राजस्थान, पश्चिम बंगालमधील त्यांच्या गावी जाऊन पकडून आणतात. पण, येथे भलतेच घडले. कारागीराने स्वतःचे सोने वापरून दागिने बनविले. सराफाने “फाईन सोने आणून देतो” असे सांगून ते दागिने घेऊन गेला आणि कारागीराची २७ लाख ६२ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत अमर पाचू माजी (वय ५२, रा. गुरुवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राजाराम मोरे, मनोज मोरे (रा. आंगणवाडी, मोरे सव्ती, चिखली) आणि विकास इंगळे (रा. तपकीर गल्ली, बुधवार पेठ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ८ ऑगस्ट २०२४ पासून आजपर्यंत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा बुधवार पेठेत ‘अमर माजी गोल्डस्मिथ’ या नावाने सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे. ते रविवार पेठ परिसरातील सराफ व्यवसायिकांकडून सोने घेऊन ऑर्डरप्रमाणे दागिने बनवून देतात.
विकास इंगळे हा सोने आटविण्याचे काम करतो. तो गेल्या २० वर्षांपासून फिर्यादींच्या ओळखीचा आहे. १६ जुलै २०२४ रोजी तो राजाराम मोरे व मनोज मोरे यांना घेऊन दुकानात आला. “माझ्या जावयाचा ‘पूजा ज्वेलर्स’ या नावाने चिखली येथे सोन्याचे दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे जवळपास ३ किलोपर्यंत भांडवल आहे. व्यवसाय मोठा आहे. त्यांना दागिने बनवायचे आहेत,” असे सांगितले.
विकास इंगळे हा ओळखीचा असल्याने त्याच्या विश्वासावर माजी यांनी दागिने बनवून देण्यास सहमती दर्शवली. त्यांनी आपल्या ताब्यातील ६७६ ग्रॅम फाईन सोने दिले आणि ऑर्डरप्रमाणे दागिने बनविण्यास सांगितले. “लागल्यास तुमच्याकडील सोने वापरून दागिने बनवा. टाकलेले सोने लगेच परत करतो,” असा विश्वासही दिला.
त्याप्रमाणे पेंडल, मंगळसूत्र, मंगळसूत्र वाटी, कानचैन, लेडीज अंगठी, मंगळसूत्र आदी मिळून एकूण ११३३ ग्रॅमचे दागिने बनविले. ८ ऑगस्ट रोजी राजाराम मोरे, मनोज मोरे आणि विकास इंगळे हे बनवलेले दागिने घेण्यासाठी आले.
“टाकलेले २७ लाख ६२ हजार रुपयांचे ४०६ ग्रॅम सोने लवकरच परत करतो,” असे सांगून ते दागिने घेऊन गेले. त्यानंतर वेळोवेळी सोन्याची मागणी केली असता त्यांनी ते परत केले नाही. शेवटी त्यांनी फसवणुकीची तक्रार दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.
