आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आणि “येसूबाई” दागिन्याचे उद्घाटन

Spread the love

पुणे: आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय आणि नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी वारी दरम्यान वारकऱ्यांसाठी आकुर्डी येथे आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

निमा संस्थेच्या वुमन फोरमच्या अध्यक्षा डॉ. जबीन पठाण आणि त्यांच्या टीमने वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून औषधांचे नियोजन केले तसेच वारीदरम्यान तब्येतीची काळजी कशी घ्यावी, यासंदर्भात मार्गदर्शन केले.

महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी साक्षी शिंदे आणि तिचे वडील ॲड. भाऊसाहेब शिंदे यांनी सर्व वारकऱ्यांसाठी त्यांच्या निवासस्थानी जेवणाची व्यवस्था केली होती. याच वेळी भारतीय ज्ञान प्रणाली (आय. के. एस.) अंतर्गत नव्याने विकसित करण्यात आलेल्या “येसूबाई” नथ या दागिन्याचे उद्घाटन करण्यात आले.

हा दागिना बनवण्यासाठी उज्वलावीरा बिडकर यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन व मदत केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर नजरकैदी असताना पुन्हा स्वराज्य निर्माण करणाऱ्या राजमाता “येसूबाई” यांचे नाव या नथीला देण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी या आरोग्य तपासणी शिबिराच्या आयोजनासाठी “निमा”च्या डॉक्टरांचे आभार मानले आणि “येसूबाई” या नवीन दागिन्याच्या उत्पादनासाठी मदत करणाऱ्यांचे अभिनंदन करून आभार मानले.

या कार्यक्रमाचे नियोजन डॉ. अनिकेत गरुड, डॉ. बापुसो यादव, डॉ. निकिता पारगे, डॉ. अभय शिंदे, प्रा. काजल भगत आणि डॉ. ऐश्वर्या उंचेगावकर यांनी केले.