अधिकार नसताना परवाना निरीक्षकाकडून कोऱ्या नोटिसा : आर्थिक व्यवहाराचा संशय, चौकशीची मागणी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना विभागात अधिकारांच्या अतिरेकामुळे अनियमितता समोर येत असून, एका निरीक्षकाने नियम डावलून व्यापाऱ्यांना कोऱ्या नोटिसा पाठवल्याचा प्रकार उघड झाला आहे. यामध्ये मोठ्या आर्थिक व्यवहाराचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या व्यापारी सेलचे अध्यक्ष भरत सुराणा यांनी केली आहे.
पुणे महापालिकेच्या बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयात कार्यरत असलेल्या आकाश चिन्ह परवाना निरीक्षक विजय थन्वाल यांनी कोणतीही अधिकृत तपासणी न करता व्यापारी व दुकानदारांना कोऱ्या नोटिसा पाठवल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे, या विभागात एकच परवाना निरीक्षक असतानाही तीन वेगवेगळ्या स्वाक्षऱ्या असलेल्या नोटिसा व्यापाऱ्यांना मिळाल्या असून, यातून मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशय व्यक्त होत आहे.
या प्रकरणी भरत सुराणा यांनी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, आकाश चिन्ह व परवाना विभागाचे अतिरिक्त आयुक्त तसेच दक्षता कार्यालयाच्या उपायुक्तांना निवेदन दिले आहे.सुराणा यांनी सांगितले की, नोटीस पाठविण्याचा अधिकार केवळ क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे असूनही निरीक्षक विजय थन्वाल यांनी नियमांचे उल्लंघन करत ही कारवाई केली. अनेक नोटिसांमध्ये तपासणी अहवाल अपूर्ण असूनही नोटिसा देण्यात आल्या आहेत.
दुकानाच्या नामफलकाच्या बाबतीत ठराविक परिमाणांचे नियम असून, दुकानाच्या दर्शनी भागात तीन फूटांपेक्षा अधिक रुंदीचा फलक लावू नये, असे आदेश आहेत. त्याचवेळी नवीन नियमावलीसंदर्भात विधी विभागाकडून प्रस्तावही आयुक्तांकडे प्रलंबित आहे. असे असतानाही व्यापाऱ्यांना नोटिसा पाठवून नाहक त्रास देण्यात येत आहे.
विजय थन्वाल यांच्या कारभारावर आधीपासूनच अनेक तक्रारी आहेत. त्यांनी व्यापाऱ्यांकडून नोटीस देऊन आर्थिक व्यवहार केल्याचा संशय असून, बिल्डरांना नोटीस देऊन नंतर त्यांच्यासोबत लाखो रुपयांचे व्यवहार झाले असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
त्यांच्याविरुद्ध बिबवेवाडी कार्यालयाबाहेर आंदोलनही करण्यात आले आहे. त्यांनी दमदाटी, भाईगिरीच्या भाषेचा वापर केल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली आहे. भरत सुराणा यांनी मागणी केली की, विजय थन्वाल यांच्या संपत्तीची चौकशी करावी.
त्यांच्याविरुद्ध दक्षता विभागामार्फत सखोल चौकशी करून तात्काळ योग्य ती कारवाई करण्यात यावी. अन्यथा काँग्रेसच्या व्यापारी सेलकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
