फ्लॅटचा ताबा देण्यासाठी ३५ हजारांची लाच घेतली : लाचलुचपत विभागाची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : न्यायालयाच्या आदेशानंतर भाडेकरूच्या ताब्यातून फ्लॅट मिळवून दिल्यानंतर मालकाकडून ३५ हजार रुपयांची लाच घेताना दोन न्यायालयीन लिपिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. गजाआड झालेल्या लिपिकांची नावे रवींद्र हिंदुराव पवार (वय ४०) आणि अमित बबन भुसारी (वय ३४) अशी आहेत. दोघांचीही नियुक्ती भाडे नियंत्रण कायदा न्यायालयात करण्यात आली होती.
तक्रारदार यांचा फ्लॅट हिंगणे खुर्द येथील विठ्ठलवाडी परिसरातील ‘विशाल पार्क’ सोसायटीत असून, त्यांनी तो भाड्याने दिला होता. मात्र, भाडेकरू फ्लॅट खाली करत नसल्याने तक्रारदारांनी भाडे नियंत्रण न्यायालयात खटला दाखल केला.
न्यायालयाने तक्रारदारांच्या बाजूने निर्णय देत फ्लॅटचा ताबा त्यांना परत द्यावा असा आदेश दिला. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी लिपिक पवार आणि भुसारी यांची नियुक्ती करण्यात आली होती तक्रारदारांना फ्लॅटचा ताबा देण्यासाठी या दोघांनी सुरुवातीला ४० हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रारदाराने २१ जून रोजी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर २५ जून रोजी पडताळणी झाली, ज्यामध्ये दोघांनी ३५ हजार रुपयांवर तडजोड करून लाच घेण्यास संमती दिली. २७ जून रोजी या प्रकरणात सापळा रचण्यात आला.
न्यायालयाच्या आदेशानुसार लिपिकांनी भाडेकरूकडून फ्लॅटचा ताबा घेऊन तो तक्रारदाराला हस्तांतरित केला. त्यानंतर सिंहगड रोडवरील ‘राधा प्युअर व्हेज’ हॉटेलबाहेर तक्रारदाराच्या वाहनातच त्यांनी ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ अटक केली.
या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
