आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

संगणक अभियंत्याची पावणेचार कोटींची फसवणूक

Spread the love

पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळेल, असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका संगणक अभियंत्याची तब्बल ३ कोटी ७१ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी वानवडी परिसरात राहणाऱ्या ५३ वर्षीय संगणक अभियंत्याने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरून तक्रारदाराला शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी आमंत्रित करणारा मेसेज पाठवण्यात आला. त्यामध्ये मोठ्या परताव्याचे आमिष देण्यात आले होते.

त्यानंतर तक्रारदाराला एका सोशल मीडिया ग्रुपमध्ये सामील करून घेण्यात आले. त्यात मोठ्या किंमतीचे शेअर्स खरेदी केल्यास भरघोस नफा मिळेल, असे सांगण्यात आले. या व्यवहारासाठी एक विशेष अ‍ॅप वापरण्याचा सल्लाही त्यांना देण्यात आला, ज्यामध्ये शेअर खरेदी-विक्रीचे व्यवहार दिसतील, असा दावा करण्यात आला.

गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत, तक्रारदार अभियंत्याने चोरट्यांनी दिलेल्या १९ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वेळोवेळी ३ कोटी ७१ लाख २५ हजार रुपये वर्ग केले. प्रारंभी परताव्याच्या स्वरूपात फक्त ७ हजार रुपये त्यांना मिळाले.

मात्र पुढे कोणताही परतावा मिळाला नाही आणि फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक निकम करत आहेत.

सायबर पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की, सोशल मीडियावरून आलेल्या शेअर मार्केट संबंधित मेसेजकडे दुर्लक्ष करावे, व केवळ मान्यताप्राप्त आणि विश्वसनीय शेअर ट्रेडिंग संस्थांमार्फतच गुंतवणूक करावी.