अहिल्यानगरमधून अटक : साडेतीन लाखांचा ऐवज जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पिस्तूल आणि कोयत्याचा धाक दाखवून वडगाव येथील श्री गजानन ज्वेलर्सवर दरोडा टाकणाऱ्या तिघा सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अहिल्यानगर येथून जेरबंद केले आहे. त्यांच्यातील एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी मंगळवारी रात्री ताब्यात घेतले होते.
वरदन संजय खरटमल (वय २०, रा. शांताईनगर, पठार वस्ती, वडगाव), अमर हनुमंत बाभळे (वय २०, रा. धबाडी, वडगाव बुद्रुक) आणि ओंकार रवि शिंदे (वय २२, रा. मानाजीनगर, नऱ्हे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून साडेतीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याबाबत अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांनी माहिती दिली.
सराफ व्यावसायिक मंगल शंकरराव घाडगे (वय ५५, रा. सदाशिव दांगटनगर, धबाडी, आंबेगाव) यांचे श्री गजानन ज्वेलर्स हे सराफी दुकान वडगाव बुद्रुक येथे आहे. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास दोन दरोडेखोर दुकानात शिरले. त्यावेळी त्यांचा एक साथीदार बाहेर दुचाकीवर बसलेला होता.
त्यांच्यातील एकाने हातातील कोयता आणि पिस्तूलाचा धाक दाखवून सोन्याचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्याला मंगल घाडगे यांनी प्रतिकार केला. तेव्हा दरोडेखोराने त्यांच्या डोक्यात आणि हाताच्या दंडावर कोयत्याने हल्ला केला. त्यामध्ये त्या जखमी झाल्या.
दरोडेखोरांनी कपाटाच्या काचा हत्याराने फोडून, कपाटामधील ४ लाख ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. दुचाकीवरून जाताना त्यांनी हातातील पिस्तूल व लोखंडी हत्यारे हवेत फिरवत लोकांमध्ये दहशत निर्माण करून पळून गेले.
या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. दरोडेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. घटनेनंतर तात्काळ गुन्हे शाखेच्या युनिट १, २, ३ तसेच खंडणी विरोधी पथक व दरोडा-वाहन चोरी विरोधी पथकांनी घटनास्थळी भेट देऊन समांतर तपास सुरू केला.
तपासादरम्यान युनिट ३ व नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी निष्पन्न केले. गुन्ह्यातील अल्पवयीन मुलाला काही तासांत ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली शाईन मोटारसायकल जप्त करण्यात आली.
त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या युनिट ३ व सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या पथकाने अहिल्यानगर येथे जाऊन उर्वरित तिघा सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३ सोन्याच्या चैन व नेकलेस असा साडेतीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
