गॅस वितरकाकडे काम करणाऱ्या तरुणाकडून १३ लाखांचे मॅफेड्रॉन जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढव्यात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तरुणाला पकडून त्याच्याकडून १३ लाख ६० हजार रुपयांचे ६७ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) जप्त केले आहे.
सुनिल बिश्नाराम चौधरी (वय २०, रा. खडी मशीन चौक, कोंढवा) असे या तरुणाचे नाव आहे. सुनिल चौधरी हा मूळचा जोधपूर येथील रहिवासी आहे. गेल्या चार महिन्यांपासून तो खडी मशीन चौकातील गॅस वितरकाच्या गोदामात सिलेंडर उचलणे, गाडी भरण्याचे काम करत आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथक कोंढव्यात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार चेतन गायकवाड यांना माहिती मिळाली की, अहिल्यादेवी होळकर भाजी मंडईसमोर एक तरुण अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी तेथे सापळा रचला.
संशयास्पदरीत्या थांबलेल्या सुनिल चौधरी याला ताब्यात घेऊन झडती घेतली. त्याच्याकडे १३ लाख ६७ हजार रुपयांचे ६७ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ सापडला. त्याच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी सांगितले की, सुनिल चौधरी हा चार महिन्यांपासून पुण्यात आला आहे. जोधपूर येथील एका बिश्नोई नावाच्या व्यक्तीने त्याला हा अंमली पदार्थ दिल्याचे तो सांगत आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, चेतन गायकवाड, संदीप जाधव, आझाद पाटील, साहिल शेख, अझीम शेख, प्रफुल्ल मोरे, शेखर खराडे यांनी केली आहे.
