चतु:श्रृंगी पोलिसांची कामगिरी : गावठी कट्टा, ३ कोयते, कार व २ मोटारसायकली जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : औंध येथील विधाते वस्तीत १२ ते १५ आरोपींनी हातात लाकडी दांडके व हत्यारे घेऊन दहशत निर्माण केली होती. चतु:श्रृंगी पोलिसांनी मुळशी भागातून ७ गुंडांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, तीन कोयते, एक कार आणि दोन मोटारसायकली असा सुमारे ७ लाख ६० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
प्रतिक सुनिल कदम (वय २६), अमीर अल्लाउद्दीन शेख (वय २८, दोघे रा. कस्तुरबा गांधी वसाहत, औंध), अतुल श्याम चव्हाण (वय २७, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, औंध), रॉबीन दिनेश साळवे (वय २६, रा. दर्शन पार्क, डी.पी. रोड, औंध), समीर अल्लाउद्दीन शेख (वय २६), जय सुनिल घेंगट (वय २१), अभिषेक अरुण आवळे (वय २४, तिघे रा. कस्तुरबा गांधी वसाहत, औंध).
हे सर्व आरोपी रेकॉर्डवरील असून त्यांच्याविरुद्ध चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. २८ जून रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता औंध येथील विधाते वस्ती येथे १२ ते १५ आरोपी गप्पा मारत असलेल्या नागरिकांजवळ आले. त्यांनी हातातील लाकडी दांडके व हत्यारे हवेत फिरवत दहशत निर्माण केली होती.
या आरोपींचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, अनिकेत पोटे व तपास पथकातील अंमलदारांनी मुळशी भागातून या आरोपींना ताब्यात घेतले.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अश्विनी ननवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार श्रीकांत वाघवले, बाबुलाल तांदळे, इरफान मोमीन, बाबासाहेब दांगडे, श्रीधर शिर्के, महेंद्र वायकर, वाघेश कांबळे आणि सुरज खाडे यांनी केली.
