वारजे पोलिसांची कामगिरी : खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा होता दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडून वारजे पोलिसांनी त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस, असा एकूण ४० हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला आहे.
सागर अनिल मुंडे (वय २१, रा. शिवशक्तिनगर, सुतारदरा, कोथरूड) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर २०२१ मध्ये कोथरूड पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वारजे माळवाडी परिसरातील रामनगर, गोकुळनगर परिसरात वाहन जाळपोळ, तोडफोडीच्या घटना आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार व पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी विशेष सूचना दिल्या होत्या. २ जुलै रोजी पोलीस अंमलदार गणेश शिंदे यांना बातमी मिळाली की, कर्वेनगर येथील डी.पी. रोडवर एक जण थांबला असून त्याच्याकडे पिस्तुल आहे.
त्यानुसार पोलिसांनी डी. पी. रोडवर जाऊन शोध घेतला असता एक जण संशयास्पद हालचाल करताना दिसून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तुल व एक जिवंत काडतूस आढळून आले.
पोलीस अंमलदार गणेश शिंदे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सागर मुंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, सागर मुंडे गेल्या सहा महिन्यांपासून हे पिस्तुल बाळगत होता.
ही कारवाई पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश धेंडे, निलेश बडाख, पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार गणेश शिंदे, बालाजी काटे, योगेश वाघ, सागर कुंभार, शरद पोळ, निखील तांगडे, अमित शेलार, अमित जाधव यांनी केली आहे. वारजे माळवाडी पोलिसांनी गेल्या सहा महिन्यांत चार अवैध पिस्तुले जप्त केली आहेत. तसेच सात कोयते व तत्सम धारदार शस्त्रे जप्त करण्याच्या कारवाया केल्या आहेत.
