आधुनिक जीवनशैलीत समतोल राखण्यासाठी मानसशास्त्राची वाढती गरज : प्रोफेसर. डॉ. संजय बी चोरडिया
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सूर्यदत्त कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, इन्फर्मेशन रिसर्च अँड टेक्नॉलॉजीच्या (एससीएमआयआरटी) एमए सायकॉलॉजी विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे.
एमए सायकॉलॉजी परीक्षेमध्ये ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांनी निर्भेळ यश मिळवले असून, राधिका जाजू हिने ८१ टक्के गुण मिळवत प्रथम, तर कौसर शेख हिने ७८ टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला आहे. ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व शैक्षणिक गुणवत्तेचा वाढता आलेख यातून पुन्हा एकदा दिसून आला आहे.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा संजय चोरडिया, तसेच अभ्यासक्रम समन्वयिका डॉ. सोनिया कराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी समर्पण भावनेने कठोर परिश्रम घेत हे यश संपादन केले. विभागप्रमुख डॉ. संदीप ढोरे, प्राचार्य डॉ. श्रीकांत जगताप यांनी विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन मोलाचे ठरले.
विद्यार्थ्यांमध्ये कुशल आणि सहृदय मानसिक आरोग्य व्यावसायिक घडावेत यासाठी विभागात प्रकरणाधारित चर्चा, मानसशास्त्रीय चाचण्या, क्षेत्रकार्य तसेच मानसिक आरोग्य जनजागृती उपक्रमांची सांगड घालून शैक्षणिक शिस्तीला अनुभवाधारित शिक्षणाची जोड दिली जाते.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभाशीर्वाद दिले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या समर्पण आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक करताना सांगितले की, “आमचे विद्यार्थी कधीच मागे राहणार नाहीत, कारण त्यांच्यात सातत्य आणि नवोपक्रमशीलतेचा मूळस्वभाव आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी ‘सूर्यदत्त’च्या भक्कम शैक्षणिक पायाभरणीची साक्ष देते. मानसिक आरोग्य तज्ज्ञांची वाढती गरज लक्षात घेऊन संस्थेची सक्रिय भूमिका अधोरेखित करते. मानसशास्त्र विभाग शैक्षणिक व व्यक्तिमत्व विकासाच्या उपक्रमांना सातत्याने अधिक बळकटी देण्याच्या दिशेने कटिबद्ध आहे.”
















