५० हजारांची खंडणी मागणाऱ्या दोघा सराईत गुंडांना सिंहगड रोड पोलिसांनी केली अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात शिरून त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवत “तुला मारायची ३० लाखांची सुपारी मिळाली आहे,” असे सांगून ५० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघा सराईत गुंडांना सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे.
दादा मोरे (वय २४) आणि किरण शिंदे (वय २६, दोघे रा. वडगाव बुद्रुक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी पिस्तुल जप्त केले आहे.याबाबत अजय कचरु खुडे (वय ४५, रा. आनंदविहार, हिंगणे खुर्द) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सिंहगड रोडवरील दामोदरनगर येथे ४ जुलै रोजी रात्री ९ वाजता व ६ जुलै रोजी दुपारी सव्वा वाजता घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजय खुडे हे बांधकाम व्यावसायिक आहेत. ते ४ जुलै रोजी रात्री ९ वाजता त्यांच्या तीन मित्रांसह कार्यालयात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी दादा मोरे आणि किरण शिंदे कार्यालयात आले.
त्यांनी कार्यालयाचे शटर खाली करून फिर्यादींच्या मित्रांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. दादा मोरे याने त्याच्याकडील पिस्तुल काढून धमकावले. त्यावर अजय खुडे यांनी विचारले, “काय झाले?” यावर दादा मोरे याने सांगितले, “तुला मारायची ३० लाखांची सुपारी आलेली आहे,” असे म्हणत मित्रांना बाहेर जाण्यास सांगितले.
“आता तुझ्याकडे काय आहे ते काढून दे,” असे म्हणत धमकावले. यानंतर त्यांनी कार्यालयाचे शटर उघडून अजय खुडे यांना पुन्हा पिस्तुल दाखवत मोटारसायकलवर बसण्यास सांगितले. दादा मोरे याने “तुला आता गुडलक म्हणून टोकन द्यावे लागेल,” असे सांगून निघून गेला.
६ जुलै रोजी दुपारी सव्वा वाजता किरण शिंदे याने अजय खुडे यांना फोन करून “५० हजार रुपये आणून दे, नाहीतर मी आणि दादा मोरे तुझ्या मागे येऊ, पोलिसांकडे जाऊ नकोस,” अशी धमकी दिली.
यानंतर अजय खुडे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी दोघाही गुंडांना अटक केली आहे. दादा मोरे आणि किरण शिंदे हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, यापूर्वी त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.
















