दुर्गंधी, घाण आणि अस्वच्छतेमुळे प्रवाशांचे हाल : प्रशासनाकडे दुर्लक्ष
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भुयारी मार्ग सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून, यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या भुयारी मार्गात दारूच्या रिकाम्या बाटल्या, गुटख्याच्या पिचकाऱ्या, तसेच उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून, आरोग्याच्या दृष्टीनेही हा मार्ग धोकादायक ठरत आहे.
या भुयारी मार्गामध्ये अनेक खाद्यपदार्थ व अन्य साहित्य विक्रीची दुकाने असून, दिवसेंदिवस इथून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पुणे स्टेशनला थेट जोडणाऱ्या या मार्गामुळे येथे कायम गर्दी असते. मात्र, स्वच्छतेची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे प्रवाशांना विशेषतः महिला प्रवाशांना गंभीर त्रास सहन करावा लागत आहे.
या मार्गाची दयनीय अवस्था पाहता नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. स्वच्छता, सुरक्षा आणि योग्य देखभालीअभावी हा मार्ग अपयशी ठरत आहे. रेल्वे प्रशासन आणि महापालिका यांची उदासीनता लक्षात घेता, नागरिकांनी तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी, कचराकुंड्या आणि शौचालयांची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
“दररोज या मार्गाचा वापर करताना घाण आणि दुर्गंधीमुळे नाक बंद करून जावे लागते. आम्ही महिलांसाठी तर ही परिस्थिती आणखीनच त्रासदायक आहे,” असे एका महिला प्रवाशिने सांगितले.
प्रशासनाने त्वरित कारवाई करत या भुयारी मार्गाची साफसफाई करावी, सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी आणि स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
