पत्नीला कॅन्सर, मुलीच्या शिक्षणाचे खोटे कारण : ७३ तोळे सोन्याचे दागिने आणि १७ लाखांची रोकड केली हडप
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शहर पोलीस दलात कार्यरत असताना, आपण क्राईम ब्रँचमध्ये पीएसआय असल्याचे खोटे सांगून एका महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्नीला कॅन्सर झाला असून मुलीच्या एमबीबीएस शिक्षणाची फी भरायची असल्याचे खोटे कारण सांगून, आरोपीने या महिलेसह तिच्या पती आणि मुलाकडून ७३ तोळे सोन्याचे दागिने व १७ लाख ६४ हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
गणेश अशोक जगताप (रा. कावेरीनगर पोलीस वसाहत, वाकड) असे या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. याबाबत कोथरुडमधील एका ५१ वर्षीय महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार जानेवारी २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत फिर्यादीच्या कोथरूडमधील घरी घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व आरोपी जगताप यांच्यात अनेक वर्षांपासून ओळख होती. या ओळखीचा गैरफायदा घेत जगतापने महिलेला वेळोवेळी विविध कारणांनी आर्थिक मदतीची विनंती केली.
पत्नीचे ऑपरेशन करायचे आहे, तसेच मुलीच्या एमबीबीएस शिक्षणासाठी फी भरायची आहे, अशा सबबी सांगत त्याने महिलेकडून ७३ तोळे सोन्याचे दागिने घेतले. पोलिस असल्यामुळे स्वतःवर कर्ज घेता येत नसल्याचे सांगून, त्याने फिर्यादीच्या मुलाला वैयक्तिक कर्ज काढायला लावले. तसेच पतीचा विश्वास संपादन करून, एकूण १७ लाख ६४ हजार रुपये उकळले.
वेळोवेळी “पैसे व दागिने परत करतो” असे सांगून टाळाटाळ केली. मात्र, दागिने व रक्कम परत न केल्यामुळे फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले आणि त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने या प्रकरणाचा तपास करत आहेत.
क्राईम ब्रँचचा पीएसआय असल्याची बतावणी गणेश जगताप याने संबंधित महिलेला आपण क्राईम ब्रँचमध्ये पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) असल्याचे खोटे सांगितले होते. यापूर्वीही त्याने औंध येथील एका सराफाची फसवणूक केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणांनंतर गणेश जगताप याला पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
