ऋतुजा आत्महत्येच्या घटनेनंतर संतप्त हिंदू समाज रस्त्यावर : आमदार पडळकर यांचा सहभाग
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सांगली येथील ऋतुजा राजगे या विवाहित हिंदू महिलेला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी सासरच्या मंडळींकडून जबरदस्तीचा सामना करावा लागल्याच्या पार्श्वभूमीवर, तिने सात महिन्यांच्या गर्भासह आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेनंतर पुण्यात संतप्त हिंदू समाज रस्त्यावर उतरला आणि आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
मोर्चामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना आणि माध्यमांशी संवाद साधताना तीव्र भावना व्यक्त केल्या. त्यांनी स्पष्टपणे सांगितले, “ऋतुजाला न्याय मिळायलाच हवा.
धर्मप्रचाराला आमचा विरोध नाही, पण गरिबी आणि अज्ञानाचा गैरफायदा घेऊन धर्मांतर करवणे हा शंभर टक्के गुन्हा आहे. अशी जबरदस्ती बंद झाली पाहिजे.” पुढे बोलताना आमदार पडळकर म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ख्रिश्चन वा मुस्लिम धर्म स्वीकारलेला नाही. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला.
त्यामुळे मोर्चात त्यांचा फोटो घेऊन येणाऱ्यांनी आधी त्यांच्या विचारांची नीट जाणीव ठेवली पाहिजे.” यावेळी त्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त यांना उद्देशून सांगितले की, “ज्यांनी धर्मांतर केले आहे, आणि मृत्यूनंतर दफन करण्यासाठी ख्रिश्चन धर्मप्रथा म्हणून पेटी मागितली, तर त्यांच्याकडून जातप्रमाणपत्र घ्यावे. ख्रिश्चन असल्याचे पुरावे असतील तरच त्यांना ती सुविधा द्यावी.”
धर्मांतरविरोधी आणि लव्ह जिहादविरोधी कायदा करण्याची मागणी करताना त्यांनी स्पष्ट केले की, “सरकार यावर काम करत आहे. हिंदू समाजाने जागे होण्याची गरज आहे. जे कन्व्हर्ट झाले आहेत, ते लवकरच परत येऊन म्हणतील – ‘आम्हाला पुन्हा आपल्यात घ्या’.”
या आक्रोश मोर्चातून संपूर्ण समाजामध्ये मोठा संदेश गेला असून, धर्मांतरासारख्या जबरदस्तीच्या घटना रोखण्यासाठी कडक कायदे आणि जनजागृतीची गरज अधोरेखित झाली आहे.
