धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या नणंदेची तक्रार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : विवाहित महिलेचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल झालेल्या नणंदेने समर्थ पोलिसांकडे फिर्याद दिली असून, आपले दोन भाऊ व भावजयी यांनी वडिलोपार्जित घर बळकाविण्यासाठी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
याबाबत भवानी पेठेतील ३४ वर्षांच्या नणंदेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी २७ व २६ वर्षांचे दोन भाऊ आणि १९ वर्षांच्या भावजयीवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार त्यांच्या राहत्या घरी २०२२ पासून आतापर्यंत घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नणंद व तिचा मित्र फ्रान्सिस यांनी भावजयीने ख्रिश्चन धर्म स्वीकारावा यासाठी तिच्यावर सातत्याने दडपण आणले. तिला हाताने मारहाण केली. फ्रान्सिसने भावजयीस पिण्यासाठी बाटलीतून पाणी आणून दिले, मात्र ते न पिल्याने तिला धमकावले होते.
या प्रकरणी समर्थ पोलिसांनी नणंद व फ्रान्सिस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्याविरोधात नणंदेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी अविवाहित आहेत. फिर्यादीच्या भावांनी वडिलोपार्जित घर बळकावण्यासाठी त्यांना घराबाहेर काढण्याच्या उद्देशाने किरकोळ कारणांवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीला हाताने मारहाण केली.
धाकटा भाऊ अमित याने हातातील लोखंडी पकडीचा हत्यारासारखा वापर करून फिर्यादीच्या डाव्या हाताच्या दंडावर आणि बोटावर मारहाण करत जखमी केले. त्याचप्रमाणे दुसरा भाऊ समीर आणि त्याची पत्नी यांनी “तु आमच्या घरात राहू नकोस, निघून जा,” असे म्हणून त्यांच्या हातातील काठीने फिर्यादीच्या चेहऱ्यावर मारहाण केली आणि जखमी केले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक कुलाळ करत आहेत.
