पत्नी व तिच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पत्नी आणि तिच्या प्रियकराने दिलेल्या त्रासामुळे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नाना पेठेत घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पत्नीसह तिच्या प्रियकराविरुद्ध समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
अतुल मारुती कदम (वय ३९, रा. बालाजी कॉम्प्लेक्स, पिंपरी चौक, नाना पेठ) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. अतुल यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पत्नी सोनाली अतुल कदम (वय ३१, रा. साडेसतरानळी, हडपसर) तसेच तिचा प्रियकर कृष्णा शिंदे (रा. हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अतुल यांची आई माधुरी मारुती कदम (वय ६१) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल आणि सोनाली यांचा २०१५ मध्ये विवाह झाला होता.
विवाहानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. सोनाली वारंवार काहीतरी कारण काढून भांडण करीत आणि हडपसरला माहेरी निघून जात असे. अतुलला पत्नी सोनाली हिचे कृष्णा शिंदे याच्याशी अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. ती माहेरी निघून गेली.
त्यानंतर सोनाली आणि तिचा प्रियकर कृष्णा यांनी अतुलला त्रास देण्यास सुरुवात केली. त्याच्या मोबाईलवर संपर्क साधून धमकावण्यात आले. त्नी आणि तिच्या प्रियकराच्या त्रासामुळे अतुल यांनी गेल्या महिन्यात १५ जून रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
पत्नी आणि तिच्या प्रियकराने दिलेल्या त्रासामुळे मुलगा अतुलने आत्महत्या केल्याचे आई माधुरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. हा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे करत आहेत.
