गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने चिंचवडमध्ये हजारो भाविकांनी घेतला चरण पालखीचा लाभ
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर, भारतातील लाखो भाविकांना राष्ट्रसंत आचार्य भगवंत प. पू. श्री आनंदऋषीजी म. सा. यांच्या १४ शुभचिन्हधारी चरणस्पर्श व दर्शनाचा लाभ मिळणार आहे. हा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक लाभ मिळवून देणारा उपक्रम देशात प्रथमच साकारण्यात येत आहे.
आनंद दरबार दत्तनगर चे अध्यक्ष आणि आनंद बाबांचे परमभक्त बाळासाहेब धोका यांच्या संकल्पनेतून चरण शिल्प साकारले असून या चरणांची स्थापना आनंद दरबार येथे होणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध जैन स्थानकातून या चरणांची पालखी निघाली आहे.
उपप्रवर्तिनी प. पू. श्री, चंदनबालाजी म. सा., बुलंदवाणी प. पू. श्री. पद्मावतीजी म. सा., आदी ठाणा यांच्या पावन सानिध्यात गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून हा पालखी सोहळा श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, गांधी पेठ चिंचवडगाव येथून सुरू झाला.
श्री संघ ते कल्याण प्रतिष्ठान केशवनगर भव्य पालखी सोहळा पार पडला यामध्ये परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी चिंचवडगाव श्रावक संघाच्या महिला भगिनींनी विशेष वारकरी दिंडी स्वरूपात पालखीचे भव्य असे स्वागत केले तसेच बाळासाहेब धोका यांचा सन्मान देखील करण्यात आला.
चरण पालखी सोहळा आचार्य आनंदऋषीजी मार्ग, चिंचवड स्टेशन, जैन श्रावक संघामध्ये विसावल्या आहे. या ठिकाणी राष्ट्रसंत आचार्य भगवंत प. पू. आनंदऋषीजी म. सा. यांच्या पददर्शनासाठी रात्री दहा वाजेपर्यंत भाविक – भक्तांनी गर्दी केली होती.
यावेळी चिंचवड श्रावक संघाचे अशोक बागमार, नंदकुमार लुणावत, चिंचवड स्टेशनचे अशोक लुंकड, सुरेश मेहेर, संदेश गादिया आदी मान्यवरांसह चरण दर्शन पालखी सोहळ्यासाठी हजारो भाविक भक्त उपस्थित होते.
या चरणांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा दिनांक 18 जुलै रोजी आनंद दरबार दत्तनगर येथे सकाळी नऊ वाजता आयोजित करण्यात आला आहे तरी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने या सोहळ्यात उपस्थित राहावे असे आवाहन आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी केले आहे.
