“संधीचे सोने करा” : प. पू. साध्वी रत्न सन्मतिजी म. सा. यांचे मार्गदर्शन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : चातुर्मास निमित्त केडगाव जैन स्थानकात बुधवार, दि. ९ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ वाजता प. पू. साध्वी रत्न सन्मतिजी म. सा. आणि आदी ठाणा ४ यांचे भक्तिभावपूर्ण स्वागतात मंगलमय आगमन झाले.
या आगमनानिमित्त केडगाव शहरात जैन समाजामध्ये उत्साहाचे वातावरण होते. आगमनासाठी केडगाव पेठेमध्ये मोठ्या संख्येने श्रावक-श्राविका, समाजबांधव आणि पदाधिकारी उपस्थित होते. धर्मप्रेमाने सजवलेले स्वागत कमानी, फलक, झेंडे आणि घोषणांनी संपूर्ण परिसर गूंजत होता.
आगमनानंतर जैन स्थानकात आयोजित धर्मसभेत प. पू. सन्मतिजी म. सा. यांनी उपस्थितांना धर्माचरण, संयम, व्रत-उपवास, व्याख्याने आणि अनुष्ठान यांच्या माध्यमातून आत्मोन्नती साधण्याचे मार्गदर्शन दिले. “संधीचे सोने करा” असा प्रभावी संदेश देत त्यांनी चातुर्मास काळातील आध्यात्मिक साधनेचे महत्त्व अधोरेखित केले.
या प्रसंगी सिद्धचलम येथे वृक्षारोपणाचा संकल्पही करण्यात आला. या उपक्रमाला जैन समाजाबरोबरच समाजातील इतर भाविकांनीही देणग्या जाहीर करत सक्रिय सहभाग नोंदवला. कार्यक्रमाला भिगवण, वडगावशेरी, अष्टापुर, पुणे, कामशेत, वाघोली, वरवंड, भांडगाव, यवत, येरवडा आदी परिसरांतील जैन श्रावक-श्राविका आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वांचे केडगाव जैन श्रावक संघातर्फे औपचारिक स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोपावेळी रवींद्र रायसोनी यांच्या वतीने उपस्थितांना नवकारशी प्रदान करण्यात आली. उपस्थितांनी भावपूर्ण वातावरणात नवकारशीचा लाभ घेतल्यानंतर मांगलिक वचने देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

















