जैन संकल्प प्रतिष्ठानच्या आयोजनात साधना, संस्कार व सेवाभावाचे दर्शन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : दि. १० जुलै २०२५ रोजी जैन संकल्प प्रतिष्ठान, उरुळी कांचन यांच्या वतीने चातुर्मास स्थापना, गुरुपौर्णिमा व माता पूजन सोहळ्याचे भव्य आयोजन भक्तिभावात पार पडले.
या पवित्र धार्मिक सोहळ्यास प. पू. सौरभ सुधाजी म. सा. व प. पू. गोयम सुधाजी म. सा. यांचे पावन सान्निध्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाने उपस्थित भाविकांना धर्म, साधना, क्षमा, मैत्री आणि कृतज्ञतेच्या मूल्यांचे स्मरण झाले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता प्रवचनाने झाली. चातुर्मासाचे धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक महत्त्व सांगताना दोन्ही महाराज साहेबांनी आपल्या प्रवचनातून श्रावकांना संयम आणि साधनायोग्य जीवन जगण्याचा प्रेरणादायी संदेश दिला.
यानंतर मोठ्या भक्तिभावात माता पूजन सोहळा पार पडला. ‘मातृदेवो भव’ या संस्कृतीचा जागर करत भाविकांनी आपल्या मातृप्रती कृतज्ञता व्यक्त केली. माता पूजनानंतर सर्व भाविकांसाठी अल्पोपहाराचे सुंदर आयोजन करण्यात आले होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन जैन संकल्प प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केले होते. परिसरातील उरुळी कांचनसह आसपासच्या गावांमधून आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. उपस्थित सर्वांनी कार्यक्रमाचे अत्यंत भावपूर्ण अनुभव घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, सेवेकरी, संयोजक व श्रद्धावान भाविक यांचे आभार मानण्यात आले.

















