गुरुच्या आशीर्वादाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण घडणीस दिशा : प्रा. डॉ. संजय चोरडिया
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुरुजनांचा सन्मान सोहळा प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. हा सोहळा बावधन कॅम्पसमधील बन्सी-रत्न सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमात निवृत्त एअरमार्शल भूषण गोखले (सूर्यदत्त ग्लोबल श्रेष्ठ सैनिक पुरस्कार), ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस (साहित्य रत्न पुरस्कार), पद्मश्री गिरीश प्रभुणे (राष्ट्रसेवा पुरस्कार), ‘एमआयटी’चे अधिष्ठाता प्रा. डॉ. शरदचंद्र दराडे (गुरुवर्य पुरस्कार), जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक डॉ. विनोद शहा (रिसर्च अँड एक्सलन्स पुरस्कार), माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर (टेक्नोगुरु पुरस्कार), योगगुरू राखी गुगळे (योगगुरू पुरस्कार), राजयोगिनी बीके लक्ष्मी दीदी (शांतिदूत पुरस्कार), श्रीकांत महाराज देशमुख (पुरोहित रत्न पुरस्कार) यांचा सन्मान करण्यात आला.
सन्मानाचे स्वरूप म्हणून पुणेरी पगडी, शाल, ‘सूर्यदत्त’चा स्कार्फ, पदक व सन्मानचिन्ह देण्यात आले. यावेळी ‘सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’चे मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल व ऑपरेशन्स अँड रिलेशन्स मॅनेजर स्वप्नाली कोगजे यांनाही उल्लेखनीय कार्याबद्दल गौरविण्यात आले.
गणेशवंदना सादर करत सोनाली ससार, सिद्धी खळे, साजिरी रानवडे व गौरी देशपांडे यांनी कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील धनगर यांनी केले. संयोजनाची जबाबदारी स्वप्नाली कोगजे व मोनिका सेहरावत यांनी पार पाडली. सुरुवातीला ‘सूर्यदत्त’ संस्थेच्या परिसरात उपस्थित गुरुजनांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, सर्व विभागांचे प्रमुख, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. डॉ. चोरडिया यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “गुरुंचे स्थान आपल्या आयुष्यात सर्वोच्च आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी गुरुजनांचे मार्गदर्शन अनमोल ठरते. गुरुपौर्णिमा उत्सव हा भारतीय संस्कृती, मूल्ये आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा संगम आहे. आज विविध क्षेत्रातील मान्यवर गुरुजनांचा सन्मान करून सूर्यदत्त संस्था विद्यार्थ्यांसमोर आदर्श मांडते.”
सुषमा चोरडिया यांनी विद्यार्थ्यांना “पालक हेच पहिले गुरु आहेत, त्यांच्याविषयी आदर व कृतज्ञतेची भावना कायम ठेवावी” असा संदेश दिला. स्नेहल नवलखा यांनी स्वागत व प्रास्ताविक करत कार्यक्रमाचे शिल्प स्पष्ट केले. सन्मान स्वीकारताना भूषण गोखले यांनी समाजसेवेची प्रेरणा देत देशभक्तीचे महत्व अधोरेखित केले.
डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मनुष्याला आयुष्यभर विद्यार्थी राहण्याचा सल्ला दिला. गिरीश प्रभुणे यांनी समाजाचे ऋण फेडण्याचे महत्व सांगितले. योगगुरू राखी गुगळे यांनी सूर्यदत्त संस्थेकडून गुरु म्हणून झालेल्या सन्मानाला विशेष महत्त्व दिले. बीके लक्ष्मी दीदी यांनी एकोप्याने राहण्याचे व शांततेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले.
डॉ. शिकारपूर यांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससोबत भाषेचे कौशल्य आत्मसात करण्याचे महत्त्व पटवून दिले. डॉ. शहा यांनी पालक हेच पहिले गुरु असल्याचे सांगत त्यांच्या आदराविषयीची भावना व्यक्त केली.
श्रीकांत देशमुख यांनी समाजासाठी सकारात्मक विचार पेरण्याचा संदेश दिला. प्रा. शरदचंद्र दराडे यांनी आपल्या विद्यार्थ्याने महाविद्यालय स्थापन करून अनेक पिढ्या घडवण्याचे कार्य केल्याचा अभिमान व्यक्त केला.
हा सन्मान सोहळा म्हणजे गुरुजनांच्या कार्याचा गौरव असून सूर्यदत्त संस्थेच्या मूल्याधिष्ठित शिक्षण प्रणालीचा भाग आहे. समाजातील विविध क्षेत्रातील मार्गदर्शकांना सन्मानित करून, संस्थेने प्रेरणादायी उदाहरण विद्यार्थ्यांपुढे साकारले आहे.















