राष्ट्रीय सायबर संसाधन केंद्राचे सूर्यदत्तमध्ये उद्घाटन : डॉ. शशिकांत महावरकर यांना ‘सूर्यदत्त सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२५’
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : सायबर गुन्हेगारीला अटकाव घालण्यासाठी केवळ पोलीस व तंत्रज्ञच नव्हे, तर सामान्य नागरिकांचाही सक्रिय सहभाग आवश्यक आहे, असा संदेश ‘सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटी’ (एसआयआयएससी) येथे झालेल्या राष्ट्रीय सायबर संसाधन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी देण्यात आला.
या कार्यक्रमात पिंपरी-चिंचवडचे पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांना पोलीस सेवेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘सूर्यदत्त सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया होते.
सायबर गुन्हेगारीमुळे आज विविध स्वरूपाचे गुन्हे – डेटा चोरी, रॅन्समवेअर हल्ले, फिशिंग ईमेल, सेक्सॉरटेशन, सोशल मीडिया माध्यमातून होणारी ओळख चोरी, सायबर युद्ध अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. सुशिक्षित नागरिकही याला बळी पडत आहेत. म्हणूनच सायबर सुरक्षेसंबंधी प्रत्येकाने सजग राहावे, अशी स्पष्ट सूचना डॉ. महावरकर यांनी केली.
राष्ट्रीय सायबर सुरक्षा संशोधन परिषदेचे संचालक डॉ. ई. खालियाराज नायडू यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्स व क्वांटम संगणन यांसारख्या नवतंत्रज्ञानामुळे भविष्यात नवे धोके निर्माण होतील. या आव्हानांचा सामना करण्यासाठी शैक्षणिक संस्था, शासन व उद्योग क्षेत्र यांच्यात समन्वय आवश्यक आहे.
‘सूर्यदत्त’मधील हे राष्ट्रीय सायबर संसाधन केंद्र हे एक महत्त्वाचे पाऊल असून, हे केंद्र जनजागृती, प्रशिक्षण व सायबर संरक्षणासाठी उपयुक्त ठरेल. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेली ‘सूर्यदत्त’ ही सायबर सुरक्षेतील शिक्षण देणारी अग्रणी संस्था आहे.
हे राष्ट्रीय सायबर संसाधन केंद्र विद्यार्थ्यांना आधुनिक कौशल्ये, जागतिक दर्जाचे प्रशिक्षण व प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कार्यशाळा, परिसंवाद यामार्फत घडवेल. या माध्यमातून समाजात सायबर सुरक्षा विषयक जनजागृती वाढवण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.
या प्रसंगी ‘एसआयआयएससी’चे प्राचार्य डॉ. अरिफ शेख, बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते, सूर्यदत्तच्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, ऑपरेशन्स अँड रिलेशन्स व्यवस्थापक स्वप्नाली कोगजे, तसेच संस्थेतील जयश्री जाधव, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. अरिफ शेख यांनी केले, सूत्रसंचालन एमएस्सी सायबर सिक्युरिटीचे विद्यार्थी हिमांशू राणे याने तर आभारप्रदर्शन स्नेहल नवलखा यांनी केले.















