स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशनचे उद्घाटन पुण्यात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यात प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशन या नव्याने स्थापन झालेल्या संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्यावरणपूरक व आपत्ती रोधक बांधकामे, शाश्वत विकास आणि स्ट्रक्चरल इंजिनिअर्सच्या भूमिकेबाबत स्पष्टपणे मत मांडले.
भारत देश वेगाने प्रगतीपथावर असून लवकरच तिसऱ्या क्रमांकाची जागतिक अर्थव्यवस्था होईल, यामध्ये मोठ्या प्रकल्पांचे मोलाचे योगदान आहे. मात्र, अनेक प्रकल्प काही वर्षांतच धोकादायक ठरत आहेत, हे गंभीर चिंतनाचे कारण आहे.
चाळीस वर्षांपूर्वीची कामे आज नूतनीकरणाच्या गरजेत का आली आहेत, याचा विचार झाला पाहिजे, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. रविवारी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या सभागृहात प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशन या संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष शेषराव कदम, सचिव अजय कदम, कोषाध्यक्ष अजय ताम्हणकर, नारायण कोचक, अशोक मोरे, विरेन्द्र चव्हाण, नितीन लाळे, अंशुमन भिडे आदी मान्यवर उपस्थित होते.
ते म्हणाले की, स्ट्रक्चरल इंजिनिअर्सची संख्या कमी आहे. जर नवीन पिढी या क्षेत्रात येण्यास उत्सुक नसेल, तर नियमांमध्ये काय बदल आवश्यक आहेत, याचा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी चर्चा करून तोडगा काढता येईल.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविक भाषणात सचिव अजय कदम यांनी सांगितले की, प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशन ही नोंदणीकृत सहकारी संस्था जानेवारी २०२५ मध्ये स्थापण्यात आली असून ती स्ट्रक्चरल इंजिनिअर्सच्या व्यावसायिक, सामाजिक व कायदेशीर विकासासाठी कार्यरत राहणार आहे.
सध्या संस्थेचे १२० हून अधिक सभासद महाराष्ट्रभर विविध नागरी, औद्योगिक आणि पायाभूत प्रकल्पांमध्ये कार्यरत आहेत. अध्यक्ष शेषराव कदम यांनी आपल्या भाषणात ‘इंजिनिअर्स बिल’ ची मागणी करत सांगितले की, स्ट्रक्चरल इंजिनिअर्सना स्वतंत्र ओळख, कायदेशीर अधिकार व जबाबदाऱ्या मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
हा कायदा अस्तित्वात आल्यास या व्यावसायिकांना अधिक अधिकार व मान्यता प्राप्त होईल. संस्थेमार्फत विविध प्रशिक्षण कार्यशाळा, सेमिनार, व्याख्याने घेतली जातील. नवोदित व भावी स्ट्रक्चरल इंजिनिअर्सना मार्गदर्शन व प्रोत्साहन देऊन त्यांच्यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण करणे हा संस्थेचा मुख्य हेतू आहे.
कार्यक्रमात शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कार्यकारिणी सदस्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन वर्षा कानेटकर यांनी केले, तर आभार अजय ताम्हणकर यांनी मानले.
