राकेश जैन यांच्या स्मृतीदिनानिमित्त ४६व्या रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : स्व. श्री. राकेश देवीचंद जैन यांच्या १९व्या स्मृतीदिनानिमित्त पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि जिन कुशल सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ४६व्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून समाजात रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन पूना हॉस्पिटलचे अध्यक्ष देवीचंद जैन, मॅनेजिंग ट्रस्टी राजकुमार चोरडिया व अन्य विश्वस्तांच्या उपस्थितीत संपन्न झाले. उद्घाटनप्रसंगी बोलताना चोरडिया म्हणाले, “रक्तदानापूर्वी केली जाणारी प्राथमिक आरोग्य तपासणी रक्तदात्याच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करते. त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान करून समाजाची सेवा तर करावीच, पण स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे.”
रक्ताचा तुटवडा भासत असताना ‘राकेश जैन मेमोरिअल ब्लड सेंटर’ने फक्त पूना हॉस्पिटललाच नव्हे, तर पुण्यातील अनेक लहान-मोठ्या रुग्णालयांना वेळेवर रक्त आणि रक्तघटक उपलब्ध करून दिले आहेत. विशेषतः डेंग्यूसारख्या साथीच्या आजाराच्या काळात रुग्णांना तात्काळ प्लेटलेट्स, रक्त व इतर आवश्यक घटक वेळेत पुरवून जीवदान देण्याचे कार्य या केंद्राने केले आहे.
या शिबिरात एकूण १०१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यांच्या या सामाजिक योगदानामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचले. शिबिरात उपस्थित मान्यवरांमध्ये अध्यक्ष देवीचंद जैन, मॅनेजिंग ट्रस्टी राजकुमार चोरडिया, जॉइंट मॅनेजिंग ट्रस्टी पुरुषोत्तम लोहिया, विश्वस्त राजेशभाई शाह, नैनेश नंदू, भबुतमल जैन, अशोक ओसवाल, पूना हॉस्पिटलचे सीईओ डॉ. रवींद्रनाथ, मेडिकल डायरेक्टर ले. कर्नल (निवृत्त) डॉ. गिरीश देशमुख आणि जिन कुशल सेवा मंडळाचे अध्यक्ष सुरेश जैन यांचा समावेश होता.
















