फक्त २ तासात २% कमिशन मिळणार या आमिषाला बळी : खडक पोलिसांनी दोघांना केली अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : “फक्त २ तासांत २ कोटींच्या व्यवहारावर २ टक्के कमिशन मिळेल” – या आमिषाला बळी पडलेल्या एका बांधकाम व्यावसायिकाची तब्बल २ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी ९ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, यातील अमन लोढा आणि नितीन मोहिरे या दोघांना अटक करण्यात आली आहे.
ही घटना ८ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता शुक्रवार पेठेतील ‘भारत भुवन’मधील राधे कृष्ण इंटरप्रायझेस या कार्यालयात घडली. फिर्यादी औंध येथील ३६ वर्षीय बांधकाम व्यावसायिक असून, धाराशिव येथे त्यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय आहे. याआधी त्यांनी अमन लोढा याच्यासोबत ८-१० वर्षांपूर्वी व्यवसाय केला होता.
लोढाने ६ जुलै रोजी फोन करून सांगितले की, त्याच्या मित्राच्या ओळखीतील लोकांना तातडीने २ कोटी रुपयांची रोख रक्कम हवी आहे आणि आरटीजीएस द्वारे पेमेंट झाल्यावर २-३ तासांत ती रक्कम परत देण्यात येईल, शिवाय २ टक्के कमिशनही मिळेल.
या व्यवहारात जर कोणी मध्यस्थ असेल, तर त्यालाही प्रत्येकी १ टक्क्यांची कमिशन देण्यात येणार होती. या प्रकारचे व्यवहार यापूर्वी अंगडियामार्फत केले असल्याने फिर्यादीने विश्वास ठेवत होकार दिला.
८ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता फिर्यादी आणि अमन लोढा हे दोघे ‘राधे कृष्ण इंटरप्रायझेस’ कार्यालयात गेले.
तिथे शुभम रॉय व त्याचे दोन साथीदार आधीच उपस्थित होते. शुभम रॉय याने स्वतःला अंगडिया असल्याचे सांगितले. त्यांना २ कोटी रुपयांची दोन बॅगा दिल्या. त्यांनी त्या बॅगांचे मोजमाप करून घेतले आणि एक २० रुपयांची चिठ्ठी व त्यावर आर. के. अक्षराचा शिक्का असलेली नोट दिली – त्यामुळे विश्वास बसला.
पैसे दोन तासात परत येणार असल्याचे सांगून सर्वजण बाहेर पडले. मात्र, संपर्क होईनासा झाला. अमन लोढाचा फोन दुपारी ४.३० पर्यंत बंद येऊ लागला. ऑफिस गाठल्यावर ते बंद दिसले. फक्त अमन लोढा, नितीन मोहिरे, समीर सातव आणि एक सहकारी बाहेर थांबले होते. शुभम रॉयचा फोन पूर्णपणे बंद आला.
या घटनेनंतर फिर्यादीने ९ जुलै रोजी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अमन लोढा (रा. मारुधर रेसिडेन्सी, कोंढवा) आणि नितीन मोहिरे (रा. विशाल सहकारी संस्था, सदाशिव पेठ) यांना अटक केली आहे.
शुभम रॉय (रा. शुक्रवार पेठ), रौनक बागमार (विमाननगर), समीर सातव (वाघोली), विश्वनाथ सपकाळ, शुभम परांडे आणि अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आरोपी सध्या फरार असून पोलिस निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांच्याकडून तपास सुरू आहे.
