फेरफार रद्द करण्यासाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यासह खासगी व्यक्तीही अटकेत
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : नवीन फेरफार नोंद रद्द करण्यासाठी आणि वादग्रस्त क्षेत्र तक्रारदाराच्या नातेवाईकांच्या नावावर करण्यास मदत करण्याच्या मोबदल्यात २ लाखांची लाच स्वीकारताना शिवणे सर्कलचे मंडल अधिकारी मारुती चोरमले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी त्यांच्या कार्यालयातील खासगी व्यक्ती जयेश बारमुख यालाही अटक करण्यात आली आहे.
तक्रारदार हे औंध येथील ४६ वर्षीय नागरिक असून, त्यांच्या बहिणीने व २१ जणांनी मिळून २०१८-१९ मध्ये कुसगाव (ता. मावळ) येथील ३८ गुंठ्यांचे क्षेत्र विकसन कराराने बिल्डर पूर्णचंद्र सनातन स्वाईन यांना विकले होते. मात्र, बिल्डरने फसवणूक करत ते क्षेत्र दुसऱ्याच व्यक्तीला खरेदीखत करून विकले.
नवीन खरेदीदाराने तलाठ्याकडे सातबारा उताऱ्यावर नोंद होण्यासाठी अर्ज दिला होता. त्यानुसार तलाठ्याने फेरफार नोंद करून ती मंजुरीसाठी मंडल अधिकारी मारुती चोरमले यांच्याकडे पाठवली. ही नोंद रद्द करण्यासाठी तक्रारदाराच्या बहिणीसह इतर २१ जणांनी हरकत अर्ज सादर केला होता. चोरमले यांनी त्या अर्जावर सुनावणी सुरू केली.
सुनावणी दरम्यान, तक्रारदार यांना त्यांच्या बहिणींचे आणि इतर २१ जणांचे पॉवर ऑफ अॅटर्नी मिळाल्याने ते प्रत्येक सुनावणीस उपस्थित राहत होते. त्या दरम्यान, चोरमले यांनी ३८ गुंठ्यांची नोंद रद्द करून मूळ धारकांच्या नावे करण्यासाठी २ लाखांची लाच मागितली. तसेच, त्यांच्या कार्यालयातील जयेश बारमुख याच्याशी संपर्क साधण्यास सांगितले.
बारमुख यानेही तक्रारदाराकडे लाच मागणी करताना सांगितले की, “मंडल अधिकाऱ्यांसाठी २ लाख आणि माझ्यासाठी वेगळी रक्कम द्यावी लागेल.” त्यामुळे तक्रारदाराने १४ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. १४ आणि १५ जुलै रोजी पडताळणी करण्यात आली, ज्यात लाच मागणीचे सत्य आढळून आले.
१६ जुलै रोजी, भोसरीतील स्वाईन रोडवरील एकॉर्ड हॉस्पिटलसमोर चोरमले यांनी तक्रारदाराकडून २ लाख रुपये स्वीकारले. त्याच वेळी एसीबीने सापळा रचून त्यांना रंगेहाथ अटक केली. त्यानंतर चांदखेड येथे जयेश बारमुख याच्याही घरी धाड टाकून त्याला अटक करण्यात आली. त्यानेही तक्रारदाराकडून १० हजार रुपये फोन पे द्वारे घेतल्याचे उघड झाले.
या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर पुढील तपास करत आहेत.