कोरेगाव पार्क पोलिसांनी देवऋषीला केली अटक : मंत्राद्वारे बकरी बनविण्याची धमकी देत महिलेला फसवले
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : एकीकडे भारतीय अंतराळ स्थानकावर जाऊन पुन्हा परत आल्याचा आनंद साजरा करत विज्ञानाची प्रगती जगासमोर मांडली जात असतानाच, दुसरीकडे पुण्यासारख्या प्रगत शहरात आजही सुशिक्षित लोक देवऋषी, गंडा दोरा अशा अंधश्रद्धांमध्ये अडकत असल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे.
गुप्तधन काढून देण्याच्या बहाण्याने एका महिलेची २ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक एका तथाकथित देवऋषीने केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, ही बाब कोणाला सांगितल्यास “तुला मंत्राद्वारे बकरी करेन,” अशी धमकीही संबंधित महिलेला देण्यात आली होती. कोरेगाव पार्क पोलिसांनी या देवऋषीला अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव खानबाबा ऊर्फ मदारी महमंद खान (वय ६५, रा. मदारी वस्ती, कोरेगाव पार्क) असे आहे. याप्रकरणी कोथरूडमधील चैतन्यनगर येथे राहणाऱ्या ४२ वर्षीय महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार १२ जून ते १५ जुलै २०२५ या कालावधीत मदारी वस्तीत घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीचे निधन झाले असून त्यांना दोन मुले आहेत. घरातील समस्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या खानबाबा यांच्याशी ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत खानबाबाने वेळोवेळी तिला सोन्याचा गुप्त खजिना, मौल्यवान वस्तू व गुप्तधन मिळवून देण्याचे आमिष दाखवले आणि तिचा विश्वास संपादन केला.
गुप्तधन मिळवून देतो, असे सांगून त्याच्या प्राप्तीसाठी विविध धार्मिक विधी, हवन, पूजापाठ करण्यासाठी महिलेकडून वेळोवेळी एकूण २ लाख ६० हजार रुपये घेतले. त्यानंतर खानबाबाने एक मडके देत त्यात गुप्तधन असल्याचे सांगितले. त्या मडक्याची १७ दिवस पूजापाठ करण्यास सांगितले. १७ दिवसांनंतर मडके उघडल्यावर गुप्तधन मिळेल, असेही त्याने भासवले.
महिलेने १७ दिवस धार्मिक पूजाअर्चा केली. मात्र मडके उघडल्यानंतर त्यात काहीच नसल्याचे लक्षात आले. या प्रकाराबाबत तिने खानबाबाला विचारणा केली असता, त्याने “ही गोष्ट कोणालाही सांगितलीस, तर मंत्राद्वारे तुला बकरी करेन,” अशी धमकी देत तिला भयभीत केले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर संबंधित महिलेनं तातडीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत खानबाबा ऊर्फ मदारी महमंद खान याला अटक केली असून, न्यायालयाने १९ जुलै २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
