मध्यरात्री १५ रिक्षा, ३ कार, २ शाळेच्या बस आणि एका टेम्पोची तोडफोड
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दुचाकीवरून आलेल्या तिघा गुंडांनी धनकवडीत मध्यरात्री पुन्हा एकदा धुडगुस घालत वाहनांची तोडफोड केली. गुंडांनी १५ ऑटो रिक्शा, ३ कार, २ स्कूल बस, आणि एक टेम्पो तोडले. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा नागरिकांना मारहाण करून जखमी केले आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
धनकवडी परिसरातील केशव कॉम्प्लेक्स, सरस्वती चौक आणि नवनाथ नगर परिसरातील रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या गाड्यांवर गुंडांनी हल्ला केला. ही घटना रात्री साडे बाराच्या सुमारास घडली, तेव्हा तिघे एकाच मोटारसायकलवरून आले होते.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली; परंतु तेव्हा पर्यंत गुंड पळून गेले होते. वरिष्ठ पोलीस अधिकारी सकाळपर्यंत परिसरातच थांबले. सहकारनगर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळविले असून त्याच्या आधारे पोलीस हल्लेखोरांचा तपास करीत आहेत.
