समर्थ पोलिसांनी तिघा सराईत चोरट्यांना पकडून ठोकल्या बेड्या
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : तडीपार केले असताना शहरात येऊन साथीदारांच्या मदतीने घरफोडी करणाऱ्या तिघा अट्टल गुन्हेगारांना समर्थ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
रोहित ऊर्फ विनायक प्रमोद भोंडे (वय २१, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), रोहित ऊर्फ रावण नानाभाऊ लंके (वय २४, रा. कस्तुरबा सोसायटी, विश्रांतवाडी), निखील परशुराम खांडेकर (वय २०, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या आरोपींवर पुणे शहर परिसरात चोरी, घरफोडी, शरीराविरुद्ध गुन्ह्यांचे एकूण २९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. रोहित नानाभाऊ लंके याला परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी ३ मे २०२४ रोजी पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार केले होते. असे असताना तडीपारीचा भंग करून, साथीदारांना घेऊन त्याने ही घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
फिर्यादी यांचे घर बंद असताना, चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा ४ लाख ५७ हजार ६९८ रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेनंतर समर्थ पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून चोरट्यांचा मागोवा घेतला व घरफोडी करणाऱ्या तिघा चोरट्यांना पकडले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
चोरीस गेलेल्या रोख रकमेपैकी १० हजार रुपये, वापरलेले वाहन व हत्यारे चोरट्यांकडून जप्त करण्यात आले आहेत. ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चेतन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार पागार, औचरे, रोहिहास वाघेरे, इम्रान शेख, शिवा कांबळे, अमोल गावडे, शरद घोरपडे, भाग्येश यादव यांनी केली आहे.
