रिक्षावरून काळेपडळ पोलिसांनी चोरट्याला पकडून साडेतीन लाखांचे १५६ टायर जप्त केले
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : ज्या ठिकाणी पंक्चर काढून मिळते अशा दुकानांचे कुलूप तोडून तो केवळ दुचाकीचे नवीन टायर चोरून नेत होता. एकामागून एक घडत असलेल्या चोऱ्यांमुळे काळेपडळ पोलिसांनी याकडे लक्ष केंद्रीत केले. सीसीटीव्ही फुटेजमधून दिसलेला चेहरा आणि रिक्षाचा क्रमांक यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. तेव्हा तो निघाला रिक्षाचालक.
परवेझ लियाकत काझी (वय ४५, रा. सय्यदनगर, हडपसर) असे या चोरट्या रिक्षाचालकाचे नाव आहे. त्याच्याकडून ५ गुन्ह्यांतील ३ लाख ५३ हजार १७५ रुपयांचे एकूण १५६ टायर जप्त करण्यात आले आहेत.
काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उंड्री, सातवनगर, महंमदवाडी येथील तीन दुकानांमध्ये घरफोडी करून नवीन दुचाकी टायर चोरी झाले होते. पोलीस अंमलदार महादेव शिंदे आणि लक्ष्मण काळे यांनी टायर चोरी झालेल्या ठिकाणी भेट देऊन एकूण ४५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी केली.
त्या फुटेजमध्ये दिसलेला चोरटा आणि त्याने वापरलेल्या रिक्षाचा क्रमांक मिळाला. त्यावरून पोलिसांनी त्याची ओळख पटवून जैन टाउनशिप येथून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने उंड्री, महंमदवाडी, हांडेवाडी, तसेच लष्कर, गोकुळनगर परिसरातून पहाटेच्या सुमारास कटावणीने टायर दुरुस्ती व विक्री करणाऱ्या दुकानांचे लॉक तोडून नवीन दुचाकीचे टायर चोरल्याची कबुली दिली.
त्याच्याकडून काळेपडळमधील ३ आणि लष्कर व भारती विद्यापीठ परिसरातील प्रत्येकी १ अशा एकूण ५ गुन्ह्यांमधील १५६ टायर, एक रिक्षा आणि कटावणी असा ३ लाख ५३ हजार १७५ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
चोरीबाबत विचारले असता, “ज्या ठिकाणी पंक्चर काढून मिळते, अशा ठिकाणची दुकाने फोडायची. तेथे कॅमेरा नसतो आणि कुलूप तोडणे सोपे असते. मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची गरज असल्याने चोरी केली,” असे त्याने सांगितले.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस हवालदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतीक लाहिगुडे, पोलीस अंमलदार श्रीकृष्ण खोकले, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, नितीन शिंदे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर आणि महादेव शिंदे यांनी केली आहे.
