राजगड, घाट, धबधबे, किल्ल्यांवर सुविधा उभारण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्ह्यातील वनक्षेत्रात निसर्गरम्य पर्यटनस्थळांची मोठी क्षमता असून, त्यांचा पर्यावरणपूरक पद्धतीने विकास केल्यास जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळेल. यासाठी राजगड, जुन्नर विभागातील घाट, धबधबे, डोंगर, किल्ले आदी ठिकाणी पर्यटन सुविधा उभारण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले.
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वनपर्यटन विकासाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजीव) जयश्री पवार, पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वाहणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलींद बारभाई आदी उपस्थित होते.
राजगड पायथा परिसरात वनविभागाच्या कार्यक्षेत्रात बाके, शौचालये, दगडी पायऱ्यांचे लहान रस्ते, लाकडी रेलिंग व बॅरिकेट्स अशा सुविधा स्थानिक दगड, माती, लाकूड वापरून उभाराव्यात. सीमेंट-काँक्रीटचा वापर टाळावा, तसेच पर्यटकांना मार्गदर्शन करणारे सायनेजेस लावावेत, असेही त्यांनी सांगितले.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या कार्यक्षेत्रातील कामांसाठी संबंधित विभागाची ‘ना हरकत’ घेणे आवश्यक आहे. राजगड किल्ला युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झाल्याने येथे सुविधा उभारणीसाठी राज्य शासनाकडून मोठा निधी मिळू शकतो, असे जितेंद्र डूडी यांनी स्पष्ट केले.
जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांनी नाणेघाट, दाऱ्याघाट, आंबोली, कांचन, काळू, धूरनळी धबधबा, दुर्गवाडी कोकणकडा, भिवेगाव खेडकुंड, कुंडेश्वर निसर्ग पर्यटन, शिंगेश्वर मंदिर टेकडी, भामचंद्र डोंगर, तुकाईमाता मंदिर, अरण्येश्वर मंदिर व शिरूर ऑक्सिजन पार्क या ठिकाणी सुविधा उभारणीचा आराखडा सादर केला.
इको-टूरिझम क्षेत्रात कार्यरत संस्थांच्या प्रतिनिधींनी बैठकीत मांडलेल्या सूचनांचा समावेश विकास आराखड्यात केला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी डूडी यांनी दिले.
