महाराष्ट्र न्युज नेटवर्क
सातारा : उत्तर कोरेगाव तालुक्यातील करंजखोप गावचे आणि सध्या सातारा करंजे भैरवनाथ नगरीत वास्तव्यास असलेले कै. रामचंद्र बापूपुरी पुरीगोसावी (उर्फ तात्या) यांचे मागील वर्षी दिवाळीच्या सणात अचानक हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण पुरीगोसावी कुटुंबावर शोककळा पसरली असून, त्यांचा समाजातील जनसंपर्क आणि मार्गदर्शन लाभलेल्या अनेकांना देखील हा धक्का बसला आहे.
तात्यांचे संपूर्ण आयुष्य हे निःस्वार्थ सेवेला आणि माणसं जोडण्याला समर्पित होते. त्यांनी जागरण-गोंधळाच्या माध्यमातून तुळजाभवानी माता, मांढरची काळूबाई आदी देवींच्या उपासनेतून सातारा, कोल्हापूर, मुंबई, विदर्भ, मराठवाडा इत्यादी ठिकाणी धार्मिक कार्य केले. त्यांच्या सुसंस्कृत आणि समजूतदार नेतृत्वामुळे त्यांचा जनसंपर्क विलक्षण होता.
तात्यांनी कुटुंबासाठी फक्त एक सदस्य नव्हे तर एक आधारस्तंभ आणि मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली. ते पत्नी, मुले, सुना आणि नातवंडांसमवेत सातारा शहरातील करंजे येथे वास्तव्यास होते. घरातील सर्व निर्णयांमध्ये तात्यांचे शब्द अंतिम मानले जात, आणि त्यांच्या एकवचनी नेतृत्वामुळेच कुटुंबात एकता, शिस्त आणि सौहार्द टिकून राहिले.
माझ्यासाठी ते केवळ काका नव्हते, तर वडिलांसारखेच होते. माझ्या वडिलांच्या निधनानंतर त्यांनी मला कधीच वडिलांची जाणीव भासू दिली नाही. त्यांचा आवाज “संभाजी… साहेब…” आजही मनात घुमतो. त्यांनी नेहमी आपल्या सहकाऱ्यांना अभिमानाने सांगितले, “आमचा पुतण्या पत्रकार आहे, आणि त्याची प्रशासकीय अधिकारी वर्गातही चांगली ओळख आहे.”
तात्यांच्या जाण्याने केवळ आमच्या कुटुंबानेच नव्हे, तर समाजाने एक थोर व्यक्तिमत्व गमावले आहे. आजही त्यांच्या आठवणी डोळ्यांत अश्रू आणतात, आणि मन त्यांच्या नावाने भरून येते.अशी माहिती संभाजी पुरी गोसावी यांनी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क शी बोलताना दिली.
